तांत्रिक बिघाडानंतर शेअर बाजाराचे कामकाज सुरु

गुरूवार, 3 जुलै 2014 (15:37 IST)
तांत्रिक बिघाडामुळे आज (गुरुवार) सकाळी नेटवर्कमधील बिघाडामुळे मुंबई शेअर बाजाराचे कामकाज ठप्प झाले होते. एचसीएलच्या टेक्नीकल टीमने अडीच तास अथक प्रयत्न करून बिघाड दूर केला.

मिळालेल्या माहितीनुसार, शेअर बाजार सकाळी 9 वाजता उघडला. मात्र, सिस्टिममध्ये डाटा अपडेट होत नसल्याचे लक्षात आले. 9 वाजून 20 मिनिटांनी पासून कामकाज ठप्प झाले होते. तब्बल अडीच तासांनी कामकाज पुन्हा सुरळीत झाल्याचे सूत्रांन‍ी सांगितले.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या (बीएसई) सर्व सेगमेंटचे ट्रेडींग दुपारी साडेबारा वाजेपर्यंत बंद होते. नेटवर्कच्या दुरुस्तीचे काम झाल्यानंतर पुन्हा एकदा ट्रेडींगचे काम सुरु झाले आहे. एनएसईला या नेटवर्क बिघाडाचा कोणताही परिणाम झाला नव्हता.

सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये 87 अंकांची वाढ दिसून आली होती. बिघाड लक्षात येण्यापूर्वी निर्देशांक 25928 वर पोहोचला होता. 23 दिवसांत शेअर बाजाराच्या नेटवर्कमध्ये दुसर्‍यांदा बिघाड झाला होता. या पूर्वी 11 जूनला शेअर बाजाराच्या नेटवर्कमध्ये बिघाड झाला होता. 

वेबदुनिया वर वाचा