चेड्डार चीज इराकला निर्यात करण्याची प्रभात डेअरी लिमिटेडची पहिलीच ऑर्डर

सोमवार, 26 सप्टेंबर 2016 (17:36 IST)
प्रभात डेअरी लिमिटेड (बीएसई / एनएसई लिस्टेड) ला त्यांचे चेड्डार चीज इराकला निर्यात करण्याची पहिली ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर देशातील एका अग्रेसर ब्रॅन्डकडून देण्यात आली आहे. 
 
प्रभातचा देशातील 3 ऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा निर्मिती प्रकल्प भारतातील महाराष्ट्र राज्यात श्रीरामपूर येथे आहे. मागच्याच वर्षी हा प्रकल्प सुरू झाला असून, अल्पावधीतच देशातील अग्रगण्य क्यूएसआर आणि पिझ्झा साखळीला चीज पुरवठा करणारा प्रभात एक प्रमुख पुरवठादार म्हणून नावारूपाला आला.    
 
काही महिन्यांपूर्वी प्रभातने दुबईतील एका प्रसिद्ध आईस्क्रीम ब्रॅन्डला गोड चवीचे कंडेन्स मिल्क निर्यात करण्याची पहिली ऑर्डर मिळवली.  
 
प्रभात डेअरी लिमिटेडने यापूर्वीच तूप, सायरहित दूध भुकटी आणि सायीची दूध भुकटी मॉरीशस, नायजेरिया, मलेशिया, अल्जेरिया इत्यादी देशांना पुरवली आहे. 
 
प्रभात डेअरी लिमिटेडविषयी
 
प्रभात डेअरी लिमिटेड ही भारतातील सर्वप्रकारच्या दुग्धजन्य उत्पादनांची निर्मिती करणारी कंपनी असून आपल्या संस्थात्मक आणि किरकोळ ग्राहकांना सेवा देते आहे. कंपनी ताजी, सुकी, गोठवलेली, पारंपरिक, आणि आंबवलेल्या डेअरी उत्पादनांची निर्मिती करते. ज्यामध्ये पाश्चराइज्ड दूध, गोड कंडेन्स मिल्क, अल्ट्रा पाश्चराइज्ड किंवा अल्ट्रा-हाय टेम्परेचर (युएचटी) मिल्क, दही, डेअरी व्हाईटनर, क्लेरीफाईड बटर (तूप), चीज, पनीर, श्रीखंड, दूध भुकटी, बाळांच्या अन्नघटकांमधील पदार्थ, लस्सी आणि ताक अशी उत्पादनं समाविष्ट आहेत.
 
हे एकीकृत बिझनेस मॉडेल डेअरी उद्योगाशी संबंधित सर्व पैलूंना समाविष्ट करते आहे. त्यात पशू खाद्य पुरवठा, पशु आरोग्य आणि दूध निर्मिती क्षेत्राशी निगडीत शेतकरी, कच्चे दूध जमा करणे, त्याचे उत्पादन, प्रक्रियाजन्य दूध आणि उत्पादनांची विक्री व पुरवठ्याचा समावेश आहे. महाराष्ट्र हा भारतातील महत्त्वाचा गाय दूध निर्माता प्रदेश असून इथे प्रभाततर्फे दूध शेतक-यांकडून आणि नोंदणीकृत दूध विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर थेट दूध जमा केले जाते.
 
श्रीरामपूर (अहमदनगर) आणि नवी मुंबई येथील प्रकल्पांमध्ये मोठी, अत्याधुनिक निर्मिती सुविधा बसविण्यात आली असल्याने या प्रकल्पांची सरासरी दूध प्रक्रिया क्षमता नियमित 1.5 दशलक्ष लिटर इतकी आहे.
 
प्रभातला उत्पादन आणि निर्मिती सुविधांसंबंधी दर्जाविषयक प्रमाणपत्रे मिळाली आहेत.  फूड सेफ्टी अँड स्टॅन्डर्ड ऑथोरेटी ऑफ इंडिया (एफएसएसएआय)कडून काही उत्पादनांना; अॅगमार्ककडून तूप व बटरला; कंडेन्स मिल्क, काहीप्रमाणात साय काढलेले (पार्टली स्कीम्ड), साय काढलेले (स्किम्ड) ला आयएस 1166:1986 प्रमाणपत्र मिळाले आहे. प्रभातच्या सायविरहीत दूध भुकटी, सायीची दूध भुकटी, डेअरी व्हाईटनर, गोड चवीचे कंडेन्स मिल्क आणि युएचटी मिल्कला ‘हलाल’ प्रमाणपत्र मिळाले आहे.

वेबदुनिया वर वाचा