माणसाच्या हातून कळत-नकळत काही चुका घडत असतात. त्याबाबत प्रायश्चित घेण्याची किंवा तशी भावना असेल तर त्यासाठी क्षमा मिळवण्याची संधी प्रत्येक धर्माने त्यांना दिली आहे. अनेक धर्मांमध्ये पापक्षलानाचे वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत. पवित्र नद्या किंवा तीर्थांमध्ये स्नान केल्यानेही पापक्षालन होते, असे म्हटले जाते. मात्र तसे केल्याने तशी भावना जरी निर्माण होत असली तरी कुणी तसे लेखी लिहून देत नाही. दक्षिण राजस्थानमधील गौतमेश्वर या तीर्थावर मात्र 'पाप मुक्ती प्रमाणपत्र'ही दिले जाते.
या तीर्थावरील मंदाकिनी कुंडात स्नान केल्यावर तेथील पुजारी असे सर्टिफिकेट देतात. जयपूरपासून साडेचारशे किलोमीटरवरील आदिवासीबाहुल प्रतापगढ जिल्ह्यात हे स्थान आहे. अरावलीची पर्वतराजी आणि माळव्याच्या पठाराच्या संधीस्थळातील हे ठिकाण राजस्थान, मध्यप्रदेश व गुजरातच्या दरम्यान एक त्रिकोण तयार करते. येथील मंदाकिनी जलाला गंगेइतकेच पवित्र मानले जाते. महर्षी गौतमांना गोहत्येच्या पापापासून इथेच मुक्ती मिळाली होती, असे म्हटले जाते. या ठिकाणी अनेक आदिवासी, शेतकरी अशाचप्रकारे कळत-नकळत झालेल्या हत्येच्या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी येत असतात. कुणाच्या हातून चुकून खार मारली गेलेली असते तर कुणाच्या हातून पक्ष्यांची अंडी फुटलेली असतात. कुणाच्या वाहनाच्या धडकेत कुठल्या तरी पशूचा जीव गेलेला असतो. अशी कोणतीही घटना घडलेली नसली तरीही शेती करताना अजाणतेपणे झालेल्या किडामुंगीच्या हत्येच्या पापापासून का होईना मुक्ती मिळवण्यासाठी लोक इथे येतात. त्यांना या ठिकाणी स्नान केल्यावर पंधरा रुपयांमध्ये हे पापमुक्तीचे प्रमाणपत्रही मिळते व ते समाधानाने परत जातात.