आपल्या देशात इच्छा, आकांक्षा मनोकामना पूर्णं होण्यासाठी कोणत्या ना कोणत्या देवाला नवस करण्याची जणू प्रथाच आहे. मध्यप्रदेशात बर्हाणपूर येथील उतावळ्यानदीवरील नागमंदिरातही अशीच प्रथा आहे. विशेष म्हणजे सापाला घाबरणारे लोक आपला नवस पूर्ण झाल्यावर येथे नाग आणि नागीणीची जोडी सोडतात.
WD
शहराला लागून असलेल्या या नदीजवळील अडवाल परिवाराच्या नागमंदिरात दरवर्षी ऋषिपंचमीच्या दिवशी दर्शनासाठी गर्दी होत असते. यातील काही भक्त नवस बोलण्यासाठी तर काही नवस पूर्ण करण्यासाठी आलेले असतात. नोकरी, व्यवसायात फायदा ते अनेक रोगांना बरे करण्याचा नवस येथे बोलला जातो.
आपला नवस पूर्ण झाला की स्थानिक गारुडींकडून साप विकत घेऊन त्यांना मंदिरात सोडले जाते. गेल्या 25 वर्षांपासून मी जो नवस बोलतो तो पूर्ण होतो, त्यामुळे मी दरवर्षी येथे साप सोडत असल्याची माहिती दिलीप यादव या भक्ताने दिली.
WD
या मंदिराविषयी एक आख्यायिका आहे. जुन्या काळात चार घोडेस्वार या मार्गावरून जात होते. वाटेत एक साप काट्यात अडकला होता, त्याने माणसाचे रूप धारण करत त्यांना वाचवण्याची विनंती केली. या चार जणांनी या सापाचे प्राण वाचवले आणि तेव्हा या सापाने त्यांना वर दिला की, या अडवाल मंदिरात आलेल्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण होईल. तेव्हा पासून आजपर्यंत या मंदिरात नवस बोलले जातात.
अनेक वर्षांपासून अडवाल परिवाराकडूनच या मंदिराची देखभाल केली जात असल्याने त्यांना ‘नागमंत्री’ म्हणूनही ओळखले जाते. देशातील हे नागाचे असे एकमेव मंदिर आहे जिथे नागदेवता सर्व नवस पूर्ण करतात असा भक्तांचा दावा आहे.
WD
प्रश्न जर फक्त देवाच्या आराधनेचा आणि श्रद्धेचा असेल तर खरंच हे मंदिर अलौकिकच म्हणावे लागेल. मात्र जर येथे सोडण्यात येणा-या साप आणि नागांचे नंतर येथील गारुडी अतोनात हाल करत असतील तर... तर याला काय म्हणाल? याबाबतचे आपले विचार आम्हाला नक्की कळवा.