Makeup tips : सौंदर्यप्रसाधनं ठेवा फ्रीजमध्ये

मंगळवार, 20 जून 2023 (23:03 IST)
फ्रीजमध्ये नाशवंत पदार्थ ठेवले जातात. मात्र केवळ नाशवंत खाद्यपदार्थच फ्रीजमध्ये ठेवावेत असं नाही. लवकर खरब होणारी काही सौंदर्यप्रसाधंदेखील फ्रीजमध्ये ठेवता येतील. फ्रीजमध्ये थंड वातावरणात प्रसाधनांमध्ये बॅक्टेरिया उत्पन्न होण्याचा धोका कमी होतो. त्याबरोबर प्रसाधनाचा रंग आणि आकार सुरक्षित राहतो. अशी कोणती प्रसाधनं फ्रीजमध्ये ठेवावीत, जाणून घेऊ या.... 
 
* परफ्युम नेहमी थंड आणि कोरड्या जागी ठेवायला पाहिजे म्हणूनच परफ्यूम ठेवण्यासाठी फ्रीज ही योग्य जागा आहे. या थंड वातावरणामुळे परफ्युमचं शेल्फ लाईफ वाढतं. 
 
* डोळ्याखालील काळी वर्तुळं घालवण्यासाठी आय क्रीम्स वापरली जातात. कोल्ड आय क्रीममुळे डोळ्याखालची सूज कमी होते त्याचप्रमाणे काळवंडलेपणा कमी होतं. आय क्रीम्स फ्रीजमध्ये ठेवावीत. 
 
* उन्हाळ्यात लि‍पस्टिक वघळते. मूळ आकार नाहीसा होतो. अशी वघळलेली लिपस्टिक लावणं कठीण जातं. शिवाय उष्ण तापमानामुळे लि‍पस्टीकमधील रसायनांमध्ये बदल घडू शकतो. मूळ रंग हरवण्याचाही धोका असतो. हे सर्व टाळण्यासाठी उन्हाळ्यात लिपस्टिक फ्रीमध्ये ठेवावी. 
 
* फेशियल मास्क ठेवण्यासाठीही फ्रीज ही उत्तम जागा आहे. बाहेरच्या तापमानात फेशियल मास्कमधील काही महत्वपूर्ण घटक नष्ट होऊ शकतात. 
 
* सध्या ऑर्गेनिक मेक अपचा बोलबाला आहे. अत्यंत चांगले परिणाम मिळत असल्यामुळे ही प्रसाधनं महिलांच्या पसंतीत उतरत आहेत. मात्र ऑर्गेनिक किंवा होममेड प्रसाधनांमध्ये प्रिझर्व्हेटिव्ह नसतात. म्हणून ती लवकर खराब होतात. हे टाळण्यासाठी ऑर्गेनिक प्रसाधनं फ्रीजमध्ये स्टोअरं करावीत. 
 
* व्हिटॅमिन सी युक्त सर्व प्रसाधनं सक्रिय घटकांनी युक्त असतात. त्याचप्रमाणे प्रसाधनांमध्ये रेटिनॉल आणि पेप्टाईड असल्यास अधिक काळजी घ्यावी लागेल. उग्र तापमानात या रसायनांच्या संरचनेत बदल होऊ शकतो. म्हणूनच अशी प्रसाधनं फ्रीजमध्ये ठेवावीत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती