पुराणांनी माणसांची उंची मापली तेव्हा हिमालय मोठा होता पण आता माणूस हिमालयाहून किमान साडेपाच फूट उंच झाला आहे!
आणि कलियुगाचा धिक्कार करणार्या युगांनी ज्यातून कली शिरला ते धर्मराजाचे सडलेले बोटच तेवढे पाहिले होते आणि त्यांच्या घोडदौडीला अटकेवरच अटक बसली होती अटकेवर ज्यांचे घोडे थांबतात त्यांच्या पराक्रमाचे अखेर पानिपत होते भूतकालाच्या स्मृती आणि भविष्याच्या भीती यांनी ज्यांच्या मनात गर्दी केली होती वर्तमानातून वाट काढता येत नव्हती म्हणून जीवनाचा नकाशा ज्यांना समजला नव्हता आणि म्हणून भूतकाळाला जे माहीत नव्हते आणि भविष्य ज्याबद्दल मौन होते ते ज्यांना कळत नव्हते आणि त्या मौनातील कर्तृत्व साठवायला ज्यांच्याजवळ जागा नव्हती त्या धर्माच्या जो - जो गोळ्यांनी झापडलेल्या युगांना ज्याचे आकलन झाले नाही ते हे माझे कलियुग!
ती युगे आपल्या प्राचीन प्रेतांचे पूजन करीत पळीपंचपात्रात सागराची आचमने देत बसली आणि जग कोठल्या कोठे निघून आले! त्यांचे लांड्या सोवळ्यातले अध्यात्म जीर्ण गंजलेल्या शिव धनुष्याचाच महिमा गात बसले पण शिवधनुष्याचा महिमा गाणारे ते उचलू शकत नाहीत आणि इतिहासात रेंगाळणारे इतिहास घडवू शकत नाहीत!
माझे कलियुग आता त्या षड्दर्शनांच्या रेशमी गुंतावळी उलगडत बसणार नाही प्रत्यक्ष सत्यांच्या धारदार पात्यांनी त्या चराचरा कापीत ते जाईल
कलियुगाला आरोपीच्या पिजर्यात ज्यांनी उभे केले त्यांनीच त्या पुरातन युगांचे कबुलीजबाब घेऊन ठेवले आहेत. सत्ययुगाने अमृत वाटताना असत्याशी केलेली तडजोड त्याला नाकारता येणार आहे काय? गुरुपत्नीशी संभोगापर्यंतची पापे करणारे ते युग त्याच्या शवावर शापाची क्षते अजून कायम आहेत गर्भवती पतिव्रतेचा परित्याग आणि शूद्राच्या साधनेचा शिरच्छेद करणार्या त्या त्रेता युगालाही त्रिवार वंदन असो!
अर्धांगिनीचा जुगार खेळणारे आणि माणूस की हत्ती म्हणून वेळ मारुन नेणारे द्वापारातील त्या धर्मात्म्यांचे वारसदार अजून आपल्या भाकड गाईंचे रक्षण करीत बसले आहेत अरे, अशी कोणती पापे आहेत जी कलियुगाने केली आणि त्या युगात झाली नाहीत? असे कोणते दैन्य आहे जे कलियुगाने पाहिले पण त्या युगांनी भोगले नाही?
अश्वमेधाच्या थंड वेदीत लोळलेला मुंगुस ती सारीच युगे तुडवीत आला नव्हता काय?
माझे कलियुग हे त्या उद्याच्या 'महामानवाचे सागरतीर' ज्याला धीरे धीरे जाग येत आहे विराटाची पाने कधी संपत नाहीत धुळीतील बाराखडी गिरवता गिरवताच ती पुरातन युगे उलथून पडली कलियुग आता आकाशाची पाने वाचू लागले आहे त्या पुरातन कल्पांच्या कल्पनेतही न मावलेले
लक्ष लक्ष प्रकाशवर्षांच्या पलिकडल्या महाविस्तारापर्यंत त्याच्या दुर्बिणीचा डोळा जाऊन भिडला आहे आणि ते नासदियाचे आदिरहस्य त्याच्या प्रयोगशाळेच्या परीक्षणनळीत केव्हा तरी पकडले जाणार आहे शूद्रांच्या समूहांना मिठीत घेऊन कलियुग लिहीत आहे आता 'मनुष्यायन' आणि ते पहा लोहपंख्यांचे साहसी थवे आकाशाचे अग्निचुंबन घेण्यासाठी त्रेत्यातल्या वायुपुत्राहून उंच झेपावले आहेत अणूच्या घोड्यावर बसून आकाशगंगेला पालाण घालीत माझे कलियुग अटकेपार जाऊन पोचले आहे तेथे जेथे त्या तमाम प्राचीन युगांना प्रकाश देणारा सूर्य हा फक्त एक पिग्मी आहे!