बाबा आमटे जयंती 2024 आधुनिक भारताचे संत बाबा आमटे

गुरूवार, 26 डिसेंबर 2024 (10:30 IST)
आधुनिक भारताचे संत म्हणून ज्यांना गौरवले जाते त्या मुरलीधर देविदास आमटे ऊर्फ बाबा आमटे यांचा आज जन्मदिवस. 26 डिसेंबर 1914 रोजी महाराष्ट्रातील वर्धाच्या हिंगणघाट येथे त्यांचा जन्म झाला. त्यांना वेगाने गाडी चालवायला प्रचंड आवडायचं. इंग्रजी चित्रपट पाहण्याचीही बाबा आमटेंना आवड होती. ते केवळ चित्रपट पहायचेच नाहीत तर त्यांची समीक्षाही लिहायचे. त्यांच्या समीक्षांना अनेकांनी पसंतीची पावतीही दिली होती. बाबा आमटे समाजसेवक होते. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर (महाराष्ट्र) येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला. याशिवाय वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन आदी सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासह इतरही राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्र्नांवर आंदोलने केली. नागपूर विद्यापीठातून  बी.ए., एल्‌एल.बी. या पदव्या संपादन केल्या. वडिलांच्या आग्रहाखातर ते वकील झाले. काही काळ वकिलीही केली. बाबांनी एकदा पावसात कुडकुडत भिजणारा एक कुष्ठरोगी पाहिला. ते त्याला घरी घेऊन आले. तेव्हापासून त्यांनी कुष्ठरोग अभ्यासायला सुरुवात केली. 1952 साली वरोड्याजवळ त्यांनी आनंदवनाची स्थापना केली. 176 हेक्टर क्षेत्रात पसरलेले आनंदवन 3500 कुष्ठरोग्यांचे घर बनले आहे. कुष्ठरुग्णांना सन्मानं जगता यावं यासाठी बाबा आमटेंनी आनंदवनची स्थापना केली. त्यांना मॅगेसेसे, पद्मविभूषण, पद्मश्री आदी अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. 9 फेब्रुवारी 2008 रोजी त्यांचे निधन झाले. 
 
 
Edited By- Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती