प्रभू श्री रामाच्या आरत्या
बुधवार, 29 मार्च 2023 (12:24 IST)
नाना देही देव एक विराजे।
नाना नाटकलीला सुंदर रूप साजे।
नाना तीर्थी क्षेत्री अभिनव गति माजे।
अगाध महिमा पिंडब्रह्मांडी गाजे॥१
जयदेव जयदेव आत्मया रामा ।
निगमागम शोधीता न कळे गुणसीमा॥ध्रु.
बहुरूपी बहुगुणी बहुता काळाचा।
हरि-हर-ब्रह्मादिक देव सकळांचा।
युगानुयुगी आत्माराम आमुचा।
दास म्हणे महिमा न बोलवे वाचा॥२जय.
**********************************
स्वस्वरूपोन्मुखबुद्धि वैदेही नेली । देहात्मकाभिमाने दशग्रीवे हरिली । शब्दरूप मारुतीने सच्छुद्धि आणिली । तव चरणांबुजी येऊन वार्ता श्रृत केली । जय देव जय देव निजबोधा रामा ।। १ ।।
जय देव जय देव निजबोधा रामा । परमार्थे आरती, सद्भावे आरती, परिपूर्णकामा ।। धृ० ।।
उत्कट साधुनी शिळा सेतू बांधोनी । लिंगदेह लंकापुरी विध्वंसूनी । कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी । देह अहंभाव रावण निवटोनी ।। २ ।।
प्रथम सीताशोधा हनुमंत गेला । लंका दहन करुनी अखया मारिला । मारिला जंबुमाळी भुवनी त्राहाटिला । आनंदाची गुढी घेऊनिया आला ।। ३ ।।
निजबळे निजशक्ति सोडविली सीता । म्हणुनी येणे झाले अयोध्ये रघुनाथा । आनंदे ओसंडे वैराग्य भरता । आरती घेऊनी आली कौसल्यामाता ।। ४ ।।
अनाहतध्वनि गर्जती अपार । अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार । अयोध्येसी आले दशरथकुमार । नगरीं होत आहे आनंद थोर ।। ५ ।।
सहजसिंहासनी राजा रघुवीर । सोऽहंभावे तया पूजा उपचार । सहजांची आरती वाद्यांचा गजर । माधवदास स्वामी आठव ना विसर ।। ६ ।।
**********************************
जयजय रघुनंदन प्रभु, दिन दयाघना ।
भो ! अनाथनाथ तात, पतितपावना ॥धृ०॥
जयजय घननीळ घनःश्याम सुंदरा
जयजय गुणगंभिर धिर, विर धनुर्धंरा ।
जयजय महाराक्षस खळ, कटक मर्दना ॥जय० ॥१॥
झाला तळिं तल्पक तो, शिरिं धरी धरा ।
झाली पदकमलयुगुलिं भ्रमरि इंदिरा ।
लागलें तव गहन ध्यान, मदनदहना ॥जय० ॥२॥
जयजय रघुवीर कमल, विमल लोचना ।
जयजय भव फंद द्वंद्व, बंधमोचना ।
जयजय श्रीसच्चिद्घन, चित्तरंजना ॥जय० ॥३॥
भो जानकीनाथ, सदय, हृदयकोमला ।
हा प्रपंचताप निपत, नको नको मला ।
आलों तुज शरण रक्षि, न करि वंचना ॥जय० ४॥
तूं करुणामृतसिंधु दीनबंधु राघवा ।
तूं निर्गुण सगुणरुप, रंग आघवा ।
जयजय क्षिति गगनानल, जल प्रभंजना ॥जय० ॥५॥
तूं तारक भवसागरपुर, भक्त-सारथी ।
तुज अर्पण गंध धूप, दीप आरती ।
विष्णुदास भजन पुजन, नमन प्रार्थना ॥जय० ॥६॥
**********************************
जय देव जय देव जय चिन्मय रामा ।
आरती ओंवाळूं तुज पुरुषोत्तमा ॥ धृ. ॥
सर्वहि वस्तु तद्रूप तेज भासति रामा ।
स्थिरचर सर्वहि विश्वा तूं मंगलधामा ।
वर्णन करितां तव गुण झाली बहु सीमा ॥
कथितां मौनावली तुज मेघश्यामा ॥ जय. ॥ १ ॥
अरूप निर्गुण निर्भय सच्चितव रुप ।
प्रेमानंदे पाहतां भासें चिद्रूप ॥
अनन्याभावे भजतां होती त्वद्रूप ।
हरि तव ध्यान करितां झाला सुखरूप ॥ जय. ॥ २ ॥
**********************************
जय जय श्रीरामचंद्रा भक्तवत्सला ॥
पंचारति करितो तुज दावी पाउला ॥ धृ. ॥
अयोध्यपुर दट्टण शरयूच्या तीरी ॥
अवतरसि रवि कुळी कौसल्येमंदिरीं ॥
नगरांतील नारि सकल येति झडकरी ॥
ओंवाळीति प्रेमभरे आरती तुला ॥ जय. ॥ १ ॥
सुरवर मग पुष्पवृष्टी करुनि डोलती ॥
अप्सरादि गान अति मधुर बोलती ॥
दुष्ट दैत्य धाके बहु चित्ति पोळती ॥
त्रिभुवनांत भक्तजनां हर्ष जाहला ॥जय जय. ॥ २ ॥
पितृवचन मानुनियां विचरसी वनी ॥
दशशिर कपटे हरि जनकनंदिनी ॥
वानरदल अतितुंबळ निघसि येउनि ॥
सागरांत नामबळे सेतु बांधिला ॥ जय जय. ॥ ३ ॥
रावणादि दुष्ट दैत्य वधिसी त्यांजला ॥
विबुध मुक्त करुनि भरत राज्यिं स्थापिला ॥
जानकीसह निजगजरे येसि निजस्थळा ॥
अभयवरे विठ्ठलसुत रक्षिं आपुला ॥जय जय. ॥ ४ ॥
**********************************
जय देव जय देव जय मंगलधामा ।
भावें भजतों तुजला दे सौभाग्य रामा ॥ धृ. ॥
तव ध्यानें माझें मन मोहित झालें ॥
मनमोहन नाम तुझें म्हणूनी शोभलें ॥
भजनामृत प्रेमे प्राशन पै केलें ॥
करुणा करीं देवा सार्थक हें नमलें ॥ जय. ॥ १ ॥
देवा केले तुवां अगणित उपकार ॥
सकळहि जगताचा तूंची आधार ॥
निजभक्तांचा घेशी माथां तू भार ॥
ऎशी करुणा तुझी देवा अपार ॥ जय. ॥ २ ॥
अर्पीली काया अवघी ही तूतें ॥
पातकि आहे परि तू उद्धरी मातें ॥
शिशुहारी पडतां रक्षावें तातें ॥
सांभाळी धरुनी निजभक्तांते हाते ॥ जय. ॥ ३ ॥
आनंदाचा सतत दिन ऎसा यावा ॥
मग आम्ही प्रेमाने करूं उत्सवा ॥
दयेने तो तुवां मान्य करावा ॥
हीच प्रार्थना आहे तुजपाशी देवा ॥ जय. ॥ ४ ॥
**********************************
अॅपमध्ये पहा x