भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासंदर्भात नेतृत्व करावे, अशी विनंती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे. “मराठा समाजातील सर्वच घटकांना खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सोबत घ्यावे. समाजाच्या भल्यासाठी आरक्षणा संदर्भात पुढील दिशा ठरवून नेतृत्व करावे. राज्यातील सर्वच समाज घटक त्यांच्या नेतृत्वात काम करतील. त्यामुळे उदयन महाराजांनी धुरा सांभाळावी” असे मत विनायक मेटे यांनी व्यक्त केले आहे.
“या जगात छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13 वे वंशज छत्रपती उदयनजी महाराज यांनी पुढाकार घ्यावा. मराठा समाजासाठी काम करणाऱ्या संघटनांना उदयनराजे भोसले यांनी एकत्र करावे. मराठा समाजाचे सारथी, बलिदानांना न्याय मिळण्यासाठी नियोजन करावं, पुढची भूमिका ठरवावी आणि ते लवकरात लवकर करावे” असं विनायक मेटेंनी म्हटलं आहे.
“मराठा आरक्षणाच्या अमलबजावणीला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाजासाठी काम करणाऱ्या संघटना, नेते, पदाधिकारी, मान्यवर मंडळीनी आपापली मतं, रोष व्यक्त केला आहे. मात्र एकमेकांना पूरक नसलेली किंवा एकवाक्यता नसलेले विचार दिसतात. मराठा समाजाचे आरक्षण अबाधित राहावे यासाठी काय काय भूमिका घ्यावी, मग आंदोलनाबाबत असो, न्यायालयात असो किंवा सरकारविरोधात, भूमिका घेण्यासाठी कोणी तरी पुढाकार घेणे आवश्यक आहे” असे विनायक मेटे म्हणाले.