मराठा आंदोलकांमध्ये फूट पडल्याचे चित्र असल्याची चर्चा

शनिवार, 24 फेब्रुवारी 2024 (09:18 IST)
मराठा आंदोलकांमध्ये फूट पडल्याचे चित्र असल्याची चर्चा आहे. मराठा आंदोलनातील सहकारी अजय महाराज बारसकर यांनी मनोज जरांगेंवर मोठे आरोप केले. या आरोपाला मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तरही दिले. यातच अजय महाराज बारसकर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळत आहे.
 
राज्य सरकारने एक दिवसाचे विशेष अधिवेशन घेत मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. हे आरक्षण न्यायालयात टिकेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. मात्र, मनोज जरांगे यांनी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. यानंतर अजय महाराज बारसकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर घणाघाती टीका करत आरोप केले. यानंतर आता अजय महाराज बारसकर यांच्यावर मुंबईतील चर्चगेट परिसरात हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे.
 
मराठा बांधव आक्रमक; अजय महाराज बारसकरांवर हल्ल्याचा प्रयत्न
 
मनोज जरांगे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे मराठा बांधव अजय महाराज बारसकर यांच्याविरोधात आक्रमक झाल्याचे म्हटले जात आहे. यातूनच हा हल्ला झाला करण्यात आला असावा, अशी माहिती देण्यात आली आहे. मुंबईतील चर्चगेट परिसरामध्ये अजय महाराज बारसकर प्रवास करत असताना काही लोकांनी त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती देण्यात आली आहे.

मरीन ड्राइव्ह पोलिसांनी हल्लेखोरांना अडवले आणि ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर अजय महाराज बारसकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या हल्ल्यातील दोघांना मरिन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. गणेश ढोके पाटील, आणि संदीप एकनाथ तनपुरे अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती