शिवभक्तांनो रायगडावर येऊ नका, मराठा आरक्षणाचा पुढील दिशा मी घोषित करेन : संभाजीराजे

गुरूवार, 3 जून 2021 (16:02 IST)
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या ६ जूनला रायगडावर राज्यभिषेक सोहळा होणार आहे. संभाजीराजे यांनी सरकारला मराठा आरक्षणाच्या निमित्ताने ६ जूनचा सरकारला अल्टीमेटम देत राज्यभिषेक सोहळ्याच्या दिनी आंदोलनाची हाक दिली होती. मात्र आता यावर्षीचाही राज्याभिषेक सोहळा घरूनच साजरा करा असं संभाजीराजे यांनी आवाहन केलं आहे. शिवभक्तांनी रायगडावर येऊ नये. ठरल्याप्रमाणे मराठा आरक्षणाचा पुढील दिशा मी घोषित करेन, असं संभाजीराजे म्हणाले.
 
संभाजीराजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. मनामनात फुललेला शिवभक्तीचा सागर, उत्साहाचा क्षण, जल्लोषाचा परमोच्च बिंदू, भिरभिरणारे भगवे ध्वज, ढोल-ताशाने दुमदुमणाऱ्या कडे-कपाऱ्या अन् शिवछत्रपतींच्या अखंड जयघोषाने दणाणणारा दुर्गराज रायगड ! लाखो शिवभक्तांची हजेरी व सोहळ्याला चढलेला लोकोत्सवाचा साज!
 
दिनांक ५ व ६ जूनला थाटामाटात हा सोहळा प्रतिवर्षी साजरा होतो. गतवर्षी प्रमाणे यावर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगडावर शिवभक्तांची गर्दी राष्ट्रहिताच्या दृष्टीने घातक असेल. तसेही सरकार ने केवळ २० लोकांनाच गडावर जाण्याची परवानगी दिली आहे. यंदा सुद्धा “शिवाजी महाराज मनामनात, शिवराज्याभिषेक घराघरात” साजरा करणे, ही जबाबदार शिवभक्ताची ओळख ठरेल.
 
गतवर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिवप्रेमींना दुर्गराज रायगडावर न येता राज्याभिषेक सोहळा विधायक उपक्रम राबवून आपल्या घरातच साजरा करण्याचे आवाहन केले होते. सर्व शिवभक्तांनी माझ्या या विनंतीला मान दिला. तसेच, निसर्ग वादळ आणि कोरोनाचे आव्हान असताना, आपल्या राज्याभिषेक सोहळ्याच्या  परंपरेला खंड पडू  देणार नाही, हा शब्द मी सर्वांना दिला होता. तो मी पूर्ण केला.
 
दुर्दैवाने यावर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे यावर्षीचाही राज्याभिषेक सोहळा सर्वांनी घरात राहूनच साजरा करण्याचे आवाहन मी पुन्हा करत आहे. स्वराज्यातील नियम स्वतः छत्रपती शिवाजी महाराज सुध्दा पाळत असत. आपण त्यांच्याच आदर्शांवर चालणारे सच्चे शिवभक्त आहोत. सर्व शिवभक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी रायगडावर जाऊन आपल्या सर्वांच्या वतीने सोहळा अखंडीतपणे साजरा करण्याची जबाबदारी माझी…!
 
माझ्यासाठी आपला सर्वांचा जीव महत्वाचा आहे ; यासाठी आपण घरीच थांबावे. तुम्हा सर्वांच्या न्यायाची बाजू व पुढील दिशा, ठरल्याप्रमाणे मी राजसदरेवरुन घोषित करेन.
 
असं संभाजीराजे यांनी पोस्टद्वारे स्पष्ट केलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती