मराठा आरक्षण : आंदोलकांवर लाठीमार, रोहित पवारांनी घेतली उपोषणकर्ते मनोज जरांगेंची भेट

शनिवार, 2 सप्टेंबर 2023 (08:44 IST)
जालना येथे मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापटीचा प्रकार समोर आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जालना येथील अंतरवाली सराटी गावात ही घटना आज (1 सप्टेंबर) दुपारी घडली. सदर घटनेचे व्हीडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
 
तसंच, राजकीय पक्षांकडूनही या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याचं दिसून येतं.
रोहित पवार उपोषणकर्ते मनोज जरांगेंच्या घरी
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मराठा आंदोलकांवर लाठीमार झालेल्या अंबड तालुक्यातील अंकुशनगर, वडिगोद्री या गावांना भेटी दिल्या. याबाबत रोहित पवारांनी सोशल मीडियावरून माहिती दिली.
 
रोहित पवार यांनी या भेटीनंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली की, "उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला.या ठिकाणी नागरिकांशी, सामजिक कार्यकर्त्यांशी चर्चा केली असता या भागातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे जाणवले."
रोहित पवारांनी पुढे सांगितलं की, "पोलिसांनी लाठीचार्ज करताना महिला आहेत का पुरुष आहेत ते बघितले नाही. वयोवृद्ध नागरिकांना आणि लहान मुलांनादेखील मारहाण करण्यात आली. उपचार करणाऱ्या डॉक्टरला देखील मारहाण करण्यात आली. पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात छऱ्यांचा वापर करण्यात आला.
 
"छरे लागलेल्या युवकांच्या जखमा बघून आपल्याच नागरिकांवर अशाप्रकारे छरयांचा वापर करता येतो का, हा प्रश्न पडतो. पुढच्या आठवड्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी कुठलाही व्यत्यय नको म्हणून आंदोलन अमानुषपणे चिरडले असल्याची तसेच वरिष्ठांच्या आदेशानेच पोलिसांनी एवढी टोकाची भूमिका घेतल्याची भावना अनेक युवकांनी व्यक्त केली. या सर्व युवकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. शासनाने देखील घटनेकडे गांभीर्याने बघायला हवे."
 
नेमकं काय घडलं?
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी इथे मनोज जरांगे पाटील या कार्यकर्त्याने अंतरवली येथे त्याच्या काही सहकाऱ्यांसह उपोषण सुरु केले होते. आंदोलकांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस होता.
 
या दरम्यान त्यांची प्रकृती खालावत चालली होती. त्यामुळे अनेकांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. पण ते उपोषणावर ठाम होते. या आंदोलनात अनेक गावकरी आणि संघटना सहभागी झाले होते.
उपोषण आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांकडून उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला आंदोलकांनी विरोध केला. त्यानंतर दोन्ही बाजूने रेटारेटी झाली. पोलिसांनी लाठीचार्ज करण्यात आला.
 
तर, आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आक्रमक झालेल्या आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि लाठीचार्ज केला.
 
या प्रकरणात पोलिसांची बाजू नेमकी काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांच्या बाजूने प्रतिक्रिया आल्यानंतर या बातमीत अपडेट करण्यात येईल.
 
राजकीय नेत्यांकडून निषेध
मराठा आरक्षणाबाबत सातत्याने भूमिका मांडणारे संभाजीराजे छत्रपती यांनी याबाबत ट्विट करून निषेध व्यक्त केला.
 
ते म्हणाले, “अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलनास बसलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेराव घालत अमानुष लाठीचार्ज केला व शांततेच्या मार्गाने आपले हक्क मागण्यासाठी जमलेल्या मराठा समाज बांधवांस पांगवण्यासाठी गोळीबार केला. हे कृत्य अत्यंत निंदनीय असून कुणाच्या आदेशाने हे सर्व घडले याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ खुलासा द्यावा, अन्यथा तुम्हाला समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल.
मराठा समाजाला दिलेल्या या अमानुष वागणुकीमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वथा राज्याचे गृहमंत्री व सरकार जबाबदार असेल, असा इशाराही संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.
 
दरम्यान, या प्रकरणावर मंत्री शंभुराज देसाई यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला याबाबत प्रतिक्रिया दिली.
 
ते म्हणाले, “ही घटना खरंच योग्य नाही. परंतु, मराठा समाजाच्या आंदोलनावर लाठीमार करण्याची वेळ का आली, याची माहिती घेण्यात येत आहे. हे सरकार मराठा सरकारच्याच बाजूने उभे आहे. आपण त्यासाठी न्यायालयात लढा देत आहोत.
 
“पण न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पाहता मराठा समाजाला विविध प्रकारच्या सवलती देण्यात येत आहेत. केवळ गैरसमजातून आंदोलनकर्त्यांनी किंवा कुणीही प्रक्षुब्ध होण्याचं कृत्य करू नये. स्थानिकांचं काही म्हणणं असेल, तर मराठा आरक्षणासंदर्भातील उपसमितीच्या चर्चेतून मार्ग काढण्यात येईल. मराठा बांधवांनी संयम बाळगावं. कुणीही कायदा हातात घेऊ नये,” असं आवाहन देसाई यांनी केलं.
 
घटनेची उच्चस्तरीय चौकशी - एकनाथ शिंदे
जालन्यातील लाठीमार प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
 
ते म्हणाले, "झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून मी माहिती घेतली. मनोज जरांगे पाटील या उपोषणकर्त्यासोबत मी स्वतः परवा बोललो होतो. त्यांची जी भूमिका होती, त्याबाबत मी संबंधितांना सूचना दिल्या होत्या. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील हेसुद्धा याबाबत वारंवार बैठक घेत आहेत.
 
मी मनोजची तब्येत बिघडत चालल्याने त्याला उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. त्याच्या मागणीवर काम सुरू आहे, असं त्याला सांगितलं. मला मिळालेल्या माहितीनुसार, प्रकृती खालावलेली असल्याने मनोजला रुग्णालयात दाखल करण्यासाठी आज पोलीस गेले असताना हा प्रकार घडला आहे. मात्र, झालेला प्रकार दुर्दैवी आहे. त्याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असंही शिंदे यांनी म्हटलं.
 










Published By- Priya DIxit
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती