जालना: मनोज जरांगे पाटलांची तब्येत बिघडली; डॉक्टरांचं एक पथक तातडीने उपोषणस्थळी

बुधवार, 6 सप्टेंबर 2023 (21:05 IST)
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. सलग ९ दिवसांपासून अन्न पाण्याचा त्याग केल्याने जरांगे पाटील यांच्या रक्ताची पातळी कमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, डॉक्टरांचं एक पथक उपोषणस्थळी दाखल झालं असून जरांगे पाटील यांच्यावर उपचार केले जात आहे.
 
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं, यासाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस असून ते आपल्या मागण्यावर ठाम आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, मेलो तरी चालेल, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे.
 
दरम्यान, जरांगे यांनी राज्य सरकारला मराठ्यांचा कुणबीत समावेश करण्यासंदर्भात जीआर काढण्यासाठी ४ दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. त्यानंतर पाण्याचाही त्याग करणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला. दुसरीकडे जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी मंत्र्यांचं शिष्टमंडळ जरांगेंच्या उपोषस्थळी गेले होते. मात्र, गिरीश महाजन, संदीपान भुमरे, अतुल सावे यांच्या शिष्टमंडळाला जरांगेंचं मन वळवण्यात अपयश आलं.
 
सरकार लवकरात लवकर जीआर काढणार असल्याचं आश्वासन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजनांनी जरांगेंना दिलं आहे. त्यावेळी संदीपान भुमरे यांनी जबाबदारी स्वीकारली. मात्र, तरी देखील जरांगे मागे हटले नाहीत.
 
दरम्यान, राज्यातले विरोधी पक्षांचे अनेक मोठे नेते जालन्यात जाऊन जरांगे पाटलांची भेट घेऊन आले. या नेत्यांनी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.
 
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटलांची उपोषणस्थळी जाऊन विचारपूस केली आहे.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती