कागदाचे पुरावे म्हणजे जबाबदारी नाही का?

सोमवार, 27 नोव्हेंबर 2023 (20:17 IST)
राज्यात मराठा आरक्षणाचा विषय तापला आहे. जुन्या नोंदी असलेल्या मराठा कुटुंबांना कुणबी जातप्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसी आरक्षणात समावेश केला जाणार असल्याने राज्यातल्या अनेक ओबीसी नेत्यांनी त्यास विरोध दर्शवला आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे या आरक्षणाला विरोध करत आहेत तसेच भुजबळ यांनी जालना आणि हिंगोली येथे ओबीसी एल्गार सभा आयोजित करून या सभांमधून मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर कडाकडून टीकादेखील केली. गेल्या काही दिवसांपासून भुजबळ आणि जरांगे यांच्यात मोठा वाद चालू आहे. या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे राज्यात दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होत असल्याची टीकादेखील होऊ लागली आहे.
 
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळांना रोखावे, अशी मागणी सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्याकडून होत आहे. यावर अजित पवार म्हणाले, सर्वच नेत्यांनी जबाबदारीने बोलले पाहिजे. समाजांमध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य कोणीही करू नये. तसेच एका बाजूला छगन भुजबळ हे मनोज जरांगेंविरोधात आक्रमक झालेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधील इतर कोणताही नेता त्यांच्याबरोबर उभा राहिलेला नाही. उलट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे भुजबळांच्या वक्तव्यांवर आक्षेप घेताना दिसत आहेत. त्यामुळे छगन भुजबळांना पक्षाने एकटे पाडल्याची चर्चा होत आहे.
छगन भुजबळ यांनी आज (सोमवारी)नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले की,ओबीसी आंदोलनाच्या काळात तुम्हाला पक्षाने एकटं पाडले आहे का? कारण पक्षातील कोणताही नेता तुमच्या बाजूने बोलत नाही. यावर भुजबळ म्हणाले, अजित पवार त्या दिवशी म्हणाले, प्रत्येकाने जबाबदारीने बोलले पाहिजे. मी जबाबदारीनेच बोलतोय. भाषणांवेळी कागदी पुरावे दाखवतोय. हे कागद, हे पुरावे म्हणजे जबाबदारी नाही का? मुळात माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही. मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या अशी आमची मागणी आहे तसेच माझा झुंडशाहीला विरोध आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती