तीळगूळ घ्या गोड बोला !

सण आला संक्रांतीचा, मनापासुनी सार्‍यांना भेटा,

राग मनातला विसरूनी, तीळगूळ देऊनी गोड बोला


संक्रांत म्हणजे संक्रमण. सूर्याचा एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश म्हणजे संक्रमण. सूर्य मकर राशीत आला की मकर संक्रांत होते. या दिवसानंतर सूर्य विषुववृत्ताच उत्तरेकडे सरकू लागतो. यानंतर दिवस थोडा मोठा होऊ लागतो. संक्रांतीचा हा सण तीन दिवसांचा असतो. भोगी, संक्रांत व किंक्रांत असे तीन सण एकत्र येतात. 
 
हा सण तृप्तीचा आहे. मार्गशीर्ष-पौष हे महिने सुगीचे दिवस असतात. शेतात हरभरा, वालपापडा, ओल्या शेंगा आलेल्या असतात. संक्रांतीच्या दिवशी काही सुवासिनी पाटावर संक्रांतीचे चित्र काढून त्याची पूजा करतात. गूळ-खोबर्‍याचा नैवेद्य दाखवितात. त्यादिवशी संध्याकाळी सुवासिनींना हळदीकुंकवासाठी बोलावितात. एका मातीच्या मडक्यात भुईमूग, गाजर, उसाचे तुकडे, शेंगा, पैसा, सुपारी इ. ठेवून त्याची पूजा करतात. सुवासिनी सुगड्यांची पूजा करतात. अशा पद्धतीने रथसप्तमी पर्यंत नातेवाईक, स्नेहीमंडळी यांना तीळगूळ पाठवितात. भेटकार्ड, शुभेच्छा पाठवितात. स्वत: जाऊन तीळगूळ देतात. संक्रांत हा सण स्त्रियांचा- विशेष करून नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी महत्त्वाचा असतो. संक्रांतीच्या पहिल्या सणाला मुलीला हलव्याचे दागिने घालून सजवितात. जावयाला भेटवस्तू देतात. संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांतीचा करीचा दिवस असतो. त्यादिवशी लहान मुलांना ‘बोरन्हाण’ घालण्याची पद्धत आहे. या दिवशी प्रवासाला जाऊ नये असे म्हणतात. भांडणे, मनातील विकल्प विसरून परस्परांवर प्रेम करणे, बंधुभाव वाढविणे यातच संक्रांतीचे महत्त्व आहे. संक्रांतीच्या हळदीकुंकवाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यादिवशी सुवासिनी एकमेकीला हळदीकुंकवासोबतच तीळगूळ देतात अन्य त्या बरोबर आपल्या इच्छेनुसार एखादी भेटवस्तू देतात. यालाच वाण लुटणे असेही म्हणतात.

आजकालच्या धावपळीच्या आणि धकाधकीच जीवनात अशा काही सणांची खरंच आवश्कता आहे. त्यानिमित्ताने एकमेकांकडे जाणे- येणे होते. या कार्यक्रमांमुळे काही नवीन ओळखी होतात त्यामुळे नाती तुटणऐवजी जुळतात. वृद्धिंगत होतात. एकमेकांकडे जाणे-येणे, ओळख वाढवणे इतर वेळेस जरी शक्य नसले तरी या सणामुळे ही सुवर्णसंधी सर्वानाच मिळते.

आशा पाटील

वेबदुनिया वर वाचा