जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा हो । त्रिशूलपाणी शंभो नीलग्रीवा शशीशेखरा हो । वृषभारूढ फणिभूषण दशभुज पंचानना हो। विभूति माळा जटा सुंदर गजचर्मांबरधरा हो ॥धृ.॥ पडलें गोहत्येचें पातक गौतमॠषिच्या शिरींहो । त्यानें तप मांडिलें ध्याना आणुनि तुज अंतरी हो । प्रसन्न हौनि त्यातें स्नाना दिधली गोदावरी हो । औदुंबरमुळिं प्रगटे पावन त्रैलोक्यातें करी हो ॥ जय.॥१॥ धन्य कुशावर्ताचा महिमा वाचे वर्णूं कितीहो। आणिकही बहु तीर्थें गंगाव्दारादिक पर्वती हो । वंदन मार्जन करिती त्यांचे महादोष नासती हो । तुझिया दर्शनमात्रें प्राणी मुक्तीतें पावती हो ॥जय.॥२॥ ब्रह्मगिरीची भावें ज्याला प्रदक्षिणा जरी घडे हो । तैं तैं काया कष्टे जंव जंव चरणी रुपती खडे हो । तंव तंव पुण्यविशेषें किल्मिष अवघें त्यांचे झडे हो । केवळ तो शिवरूपी काळ त्याच्या पायां पडे हो ॥ जय.॥३॥ लावुनियां निजभजनीं सकळहि पुरविसि मनकामना हो । संतति संपति देसी अंतीं चुकविसि यमयातना हो । शिवशिव नाम जपतां वाटे आनंद माझ्या मना हो । गोसावीनंदन विसरे संसारयातना हो ॥जय.॥४॥