राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेसोबत जाणार, काहीही होऊ शकते - छगन भुजबळ

शनिवार, 26 ऑक्टोबर 2019 (10:18 IST)
राजकारणात काहीही होऊ शकते, त्यामुळे कोण कोणत्या पक्षाला घेऊन सत्ता स्थापन करू शकते. असे सूचक वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार छगन भुजबळ यांनी केले आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेसोबत जाणार का? या प्रश्नावर त्यांनी सदरचे वक्तव्य केले आहे. नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आता दिवाळी सुरू झाली आहे. त्यामुळे लवकरच आम्ही एकत्रित येऊ, आणि योग्य तो निर्णय घेऊ असेही यावेळी स्पष्ट केले.
 
यावेळी कॉंग्रेस आघाडीतील विजयी उमेदवार आ.माणिकराव कोकाटे, आ.दिलीप बनकर, आ.नरहरी झिरवाळ, आ.नितीन पवार, आ.सरोज आहेर, आ.हिरामण खोसकर यांचा पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
 
भुजबळ यांनी बोलतांना सांगितले की, पुढच्या पाच वर्षात निश्चित उलाढाली होणार आहेत. आदित्यच्या मुख्यमंत्री पदाबाबत आघाडी विचार करेल असेही त्यांनी सांगितले. सरकारला वाटेल तसे वागता येणार नाही. निवडणुकीच्या निकालातून जनतेने भाजपला हेच दाखवून दिले आहे. आधी भाजप सांगत होती स्वबळावर येऊ मात्र आता त्यांना कळून चुकले आहे असे त्यांनी सांगितले.
 
निवडणूक निकालांमध्ये वंचितचा फटका पंकज भुजबळ यांनाही बसला असल्याचे त्यांनी मान्य केले. आम्ही त्यांना सोबत घेण्याचे प्रयत्न केले होते. मात्र, त्यांच्या मागण्यांमध्ये सातत्य नव्हते. आघाडीसाठी त्यांनी केलेल्या अटीवरून त्यांना सोबत येण्याची इच्छाच नसल्याचे जाणवले होते. ते आघाडीसोबत आले असते तर त्यांचे देखील उमेदवार जिंकले असते आणि बीजेपी सत्तेपासून दूर गेली असती असे त्यांनी सांगितले.
 
निवडणुकीनंतर राष्ट्रवादीची ताकद वाढली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात नंबर एकचा पक्ष बनला आहे. सर्व आमदार जिल्ह्यातील प्रश्न सोडविण्यासाठी एकजुटीने लढा देण्यात येईल, काँग्रेस, राष्ट्रवादीने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली आहे. आम्ही मजबूत आहोत असून सरकारवर अंकूश ठेवण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षभेद विसरून केवळ काँग्रेस राष्ट्रवादी नव्हते तर शिवसेना भाजपच्या आमदारांना सोबत घेऊन एकत्र येत जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे सांगितले. यावेळी त्यांनी जनतेचे आभार मानले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती