'पक्षानं तिकीट का नाही दिलं? याचं मी आत्मपरिक्षण करतोय... त्याबद्दल पक्षश्रेष्ठींशी चर्चाही करेल. पक्षाचं काही चुकलं असेल तर पक्षही त्यावर विचार करेल. पण आज निवडणुका तोंडावर असताना कुणाचं चुकलं, कुणाचं बरोबर? हा विचार करण्याची वेळ नाही. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. संघपरिषदेचे संस्कार माझ्यावर आहेत, त्यामुळे मी राजकारणात स्वयंसेवक म्हणून काम करतो' असं भाजप नेते विनोद तावडे यांनी सांगितलं आहे.
'प्रथम देश, मग पक्ष आणि मग आपण हीच शिकवण आपल्याला संघाकडून मिळालीय. त्यामुळे तावडे पवारांना भेटले का? तावडे पक्ष सोडणार का? हा विचारसुद्धा माझ्या मनाला शिवत नाही आणि कुणी मला त्यांच्या पक्षात येण्यासाठी विचारुही शकत नाही. कारण संघ, परिषद, भाजपशी मी एकनिष्ठ आहे... आणि हे लोकांनाही माहित आहे' असं म्हणत काहीही झालं पक्षाशी आपण एकनिष्ठ राहणार अशी ग्वाहीच तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.