महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत १३ ऑक्टोबर २००९ रोजी घेण्यात आलेल्या मतदानाची मोजणी गुरूवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी होत असून त्यासाठी निवडणूक यंत्रणा आणि प्रशासनामार्फत जय्यत तयारी करण्यात आली आहे. सर्वच मतदारसंघांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे मतदान घेण्यात आल्याने मतमोजणी लवकर पूर्ण होणे अपेक्षित असून मतमोजणीसाठी राज्यभर विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
राज्याच्या १३ व्या विधानसभेसाठी २८८ मतदारसंघांत सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांनी ३१ ऑगस्ट २००९ रोजी जाहीर केले होते. त्यानुसार १८ सप्टेंबर २००९ रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली. १८ ते २५ सप्टेंबर या कालावधीत उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. २६ सप्टेंबर रोजी त्या अर्जांची छाननी करण्यात येऊन २९ सप्टेंबर रोजी पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात राहिलेल्या एकूण ३५३६ उमेदवारांसाठी १३ ऑक्टोबर २००९ रोजी ८२ हजार २८ मतदान केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिनद्वारे मतदान घेण्यात आले.
मतदानासाठी राज्यभर विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. संवेदनशील मतदान केंद्रांच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. मतदान केंद्रांवर आवश्यक असणार्या सर्व साधनसुविधेसह निर्भयपणे मतदान व्हावे यासाठी आवश्यक ती काळजी घेण्यात आली होती. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना आपले नाव शोधण्यासाठी मतदार सहाय्य केंद्र सुरू करण्यात आले होते. त्याचा मतदारांना लाभ झाला होता.