महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांत जाहीर होणार असून यावेळीही राज्यात त्रिशंकू विधानसभेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पदासाठी दावेदारांची संख्या मोठी दिसत आहे. यात प्रामुख्याने तीन ठाकरे आणि पाच माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री पदाच्या दावेदारांमध्ये कॉंग्रेसचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या व्यतिरिक्त माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि नारायण राणे हे प्रमुख आहेत. तर शिवसेनेचे मनोहर जोशी (शिवसेना) हे देखिल दावेदार समजले जात आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी उप मुख्यमंत्री आर.आर. पाटील आणि विजयसिंह मोहिते-पाटील व गोपीनाथ मुंडे यांचेही प्रयत्न सुरू आहेत.
तर ठाकरे कुटुंबीयांमध्ये शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे हे दावेदार आहेत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे देखिल यात प्रमुख दावेदार समजले जात आहेत.