निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मदत घेतली जाऊ शकते, असे दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनी सांगितले असतानाच, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र ही शक्यताच आज फेटाळून लावली. सत्ता स्थापनेची मनसेची मदत घेणार नाही आणि तशी गरजही पडणार नाही, असे पवार आज पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
बारामतीत आज प्रचाराची शेवटची सभा घेतल्यानंतर ते विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. या निवडणुकीत मनसेला ३० ते ३५ टक्के मते मिळतील आणि ते कॉंग्रेस व राष्ट्रवादीचीही मते खातील असे अजितदादा पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले होते. मात्र, आज खुद्द पवारांनी याचा इन्कार केला. मनसेला दहा टक्के मते जास्तीत जास्त मिळतील. त्यामुळे त्यांची मदत घेण्याची गरज पडणार नाही, असे ते म्हणाले. रिपब्लिकन डावी लोकशाही समितीलाही दोन आकडी संख्या गाठता येणार नाही, असे भाकीतही त्यांनी वर्तवले. शिवसेना- मनसे आपापल्या भांडणात अडकले आहेत. त्यांना लोकांच्या प्रश्नाकडे द्यायला वेळ नाही, अशी टीकाही त्यांनी केली.