राजकारणातून निवृत्तीचे विचार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मनात घोळत असले तरी, आपला वारस कोण राहिल यासंदर्भात संदिग्धता राहिल याची काळजीही घेतली आहे. आपला वारस जनताच ठरवेल, असे सांगून सुप्रिया सुळे की अजितदादा पवार असे कोणतेही स्पष्ट उत्तर देण्याचे टाळले आहे.
श्री. पवार एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. पवारांची कन्या खासदार सुप्रिया सुळे व पुतणे अजित पवार यांच्यापैकी त्यांचा वारस कोण हे स्पष्ट झालेले नाही. याचसंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी वरील उत्तर दिले. अजितदादा आणि सुप्रिया यांच्यातील संबंध भविष्यात बिघडू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पवारांनी ही शक्यता फेटाळून लावली आणि हे माध्यमांनी सोडलेले पिल्लू आहे. वास्तवात अजितदादा सुप्रिया यांना राजकारणाच्या बाबतीत सर्व प्रकारचे मार्गदर्शन करतात. त्यांना लागणारी मदतही करतात, असे त्यांनी सांगितले.
अजितदादा गेल्या वीस वर्षांपासून राजकारणात आहे. त्यांनी पाच वेळा विधानसभा निवडणूक जिंकून आपली क्षमताही सिद्ध केली आहे. या दोघांमध्ये छान संबंधही आहेत असे सांगून, सुप्रियाचा रस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात आहे. शिवाय शिक्षण आणि विकासात्मक प्रकल्पांविषयीही तिला आस्था आहे. दोघांच्या आवडीची क्षेत्रेच वेगळी असल्याने मतभेदांचा प्रश्नच उद्भवत नाही, असे पवार म्हणाले.
राजकारणातून निवृत्ती घेण्यासंदर्भात, सार्वजनिक आयुष्यात वावरणार्यांना कधी ना कधी हा निर्णय घ्यावा लागतो असे ते म्हणाले. मात्र, आपण दहा वर्षांपासून आपण हेच बोलत आहात, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, यावेळची निवडणूक मी माझ्या इच्छेविरूद्ध आणि राज्यातील पक्ष नेत्यांच्या दबावाखाली लढवल्याचे त्यांनी सांगितले.