अपयशी केंद्राला महाराष्ट्राने ताळ्यावर आणावे: मोदी

पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अवघ्या तीन महिन्यात महागाई दुप्पट करुन सामान्य जनतेचे जगणे अशक्य केले आहे. या सर्वच पातळीवर अपयशी ठरत असलेल्या केंद्र सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी महाराष्ट्रात शिवसेना - भाजप युतीस विजयी करावे असे आवाहन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूरात प्रचार सभेत बोलताना केले.

येथील सासने ग्राऊंडवर झालेल्या शिवसेना - भाजपाचे उमेदवार सुर्यकांत पाटील-बुध्दीहाळकर , सुरेश हाळवणकर, शिवसेनेचे राजेश क्षीरसागर, डॉ. सुजित मिणचेकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.

सभेच्या प्रारंभीच मराठमोळ्या भाषेत राजर्षी शाहूंच्या भूमीस माझे शतशः प्रणाम असे टाळ्याच्या गजरात म्हणत मोदी यांनी उपस्थितांची मने जिंकली. आपल्या हिंदी मिश्रीत मराठी भाषेत प्रेक्षकांची अर्धातास संवाद साधत शिवसेना-भाजप युतीलाच विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच वाढत्या महागाईसंदर्भात योग्य तो खुलासा करावा असे आव्हान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना केले.

पश्चिम महाराष्ट्राच्या साखरपट्टयात त्यांच्या या पहिल्याच जाहिर सभेची मोठी उत्सुकता लागली होती. दीड तास उशीर होऊनही प्रेक्षक भर उन्हात सभास्थानी प्रतिक्षेत होते. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा दबदबा असणार्‍या शुगर लॉबीतील नेते मंडळीनी निव्वळ आपलाच स्वार्थ साधल्याचा आरोप करत प्रत्यक्ष ऊसकरी शेतकरी मात्र गरीबच राहीला आहे,याचा निषेध नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. आधुनिक ऊस शेतीच्या आणि शेतकरी वर्गाच्या विकासासाठी महाराष्ट्रासह अवघ्या देशाने आदर्श घ्यावा अशी कामगीरी गुजरातने केली आहे. गुजरातच्या कृषी विद्यापीठातून जेनेटिक इंजिनिअरींग संशोधनाने ऊसाची उंची वाढवत आहे, त्या जमीनीतच ऊस उत्पन्न दुप्पट केल्याचेही त्यांनी टाळ्याच्या गजरात सांगितले.

निव्वळ मतपेटीच्या राजकारणातुनच जातीय वादाला काँग्रेसी सरकार खत पाणी घालत असल्याचा आरोप करत मोदी यांनी महाराष्ट्राच्या निवडणूकीत छत्रपती शिवाजी महाराज हवेत की अफजल खान याचा स्वाभिमानी जनताच निवाडा करेल असेही टाळ्यांच्या गजरात नमुद केले.

महाराष्ट्रात काँग्रेसी राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळेच वीज टंचाईचे संकट निर्माण झाल्याचे सांगत महाराष्ट्रातील गावा-गावात कधीतरी घरी वीज आल्याची चर्चा होते. तर गुजरातमध्ये फक्त दोन मिनीटे वीज गेली तरी त्याचे वृत्तपत्रात ठळक बातमी होते असेही मोदी म्हणाले. गुजरातमधील कोणत्याही गावात १०८ क्रमांकावर आपतकालिन परिस्थितीत सुसज्ज अशी रुग्णवाहीका अवघ्या सात मिनीटात उपलब्ध होते. महाराष्ट्रात मात्र देवाच्या मदतीची अपेक्षा का करावी लागते असा सवाल करत, हे चित्र बदल्यासाठी शिवसेना-भाजपाच्या उमेदवारांनाच विजयी करा असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी टाळ्यांच्या गजरात केले.

वेबदुनिया वर वाचा