'रिडालोस'ला ६० ते ७० जागा मिळतील-आठवले

वेबदुनिया

बुधवार, 30 सप्टेंबर 2009 (19:47 IST)
आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी ही लोकांच्या पसंतीस उतरत असून मनसेमुळे होणार्‍या मतविभाजनाचा फायदा आम्हालाच मिळणार आहे. निवडणुकीत आमच्या किमान ६० ते ७० जागा विजयी होतील असा विश्वास रिडालोसचे निमंत्रक रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील रिडालोसचे उमेदवार प्रशांत शेगावकर यांच्या प्रचारार्थ आले असता झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने डावलले म्हणून रिडालोसची स्थापना केली आहे. सामान्य माणसांला काँग्रेस आघाडी आणि भाजप - सेना युती हे दोघेही नको आहेत. त्यामुळे रिडालोसकडे जनता मोठ्या संख्येने वळते आहे. ही जनता रिडालोसला विजयी केल्याशिवाय राहणार नाही. ही आमची पहिलीच निवडणूक असली तरी आम्ही राज्यात ६० ते ७० जागा मिळवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमची सत्ता आली तर महाराष्ट्रातील सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही काम करू असे ते म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा