प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कॉंग्रेस आघाडीच्या प्रचारासाठी मुंबईत आलेल्या पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी सभा न घेता पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीसंबंधी आपली मते मांडली. राज ठाकरे यांना जनताच मतदानातून उत्तर देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पत्रकारांनी विविध प्रश्न विचारून त्यावर पंतप्रधानांचे मत जाणून घेतले. विदर्भातील शेतकर्यांसाठी विशेष पॅकेज दिल्यानंतरही आत्महत्या काही थांबलेल्या नाहीत, अशा वेळी सरकार पुन्हा पुन्हा पॅकेज जाहीर करत रहाणार की त्यावर कायमस्वरूपी काही उपाय योजणार असा सवाल केला असता, पॅकेज जाहीर करणे ही तात्पुरती गरज होती. ते काही कायमस्वरूपी उत्तर होऊ शकत नाही. पॅकेज देऊनही आत्महत्या थांबल्या नसतील तर त्यासाठी या प्रश्नाचा सखोल अभ्यास करून उपाय योजण्याची गरज असल्याचे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले.
राज्यातील निवडणुकांमध्ये कॉंग्रेस आघाडी पुन्हा एकदा सत्तेत येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज ठाकरेंच्या प्रचाराविषयी विचारले असता, त्यावर जास्त भर न देता, राज ज्या प्रकारचा प्रचार करीत आहेत, त्याला जनताच योग्य उत्तर देईल, असे उत्तर त्यांनी दिले.