महाराष्ट्र विधानसभेसाठी १३ ऑक्टोबरला मतदान

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकी जाहीर झाल्या असून १३ ऑक्टोबर रोजी राज्यात एकाच दिवशी मतदान होणार आहे. मतमोजणी २२ ऑक्टोबर रोजी होईल आणि त्यानंतर राज्यात नवी विधानसभा अस्तित्वात येईल.

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांनी आज नवी दिल्लीमध्ये भरगध पत्रकार परिषदेत महाराष्ट्रासह हरियाणा आणि अरूणाचल प्रदेशमधील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.

निवडणुकीची आचारसंहिता तातडीने अंमलात येत असल्याचेही मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले. सप्टेंबरच्या १८ तारखेस निवडणूकीची अधिसूचना जारी करण्यात येईल आणि त्यानंतर २५ सप्टेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील असे आयुक्त चावला यांनी सांगितले.

दुसर्‍याच दिवशी म्हणजे २६ सप्टेंबरला उमेदवारी अर्जांची छाननी होईल, तर २९ सप्टेंबर पर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे, असेही चावला म्हणाले.

महाराष्ट्रात सुमारे साडेसात कोटी मतदान असून ८० टक्के मतदारांकडे ओळखपत्रे आहेत. मतदानासाठी ८२ हजारपेक्षा जास्त मतदानकेंद्र उभारण्यात येतील. तसेच मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी सर्वस्वी राज्य सरकार आणि स्थानिक निवडणूक यंत्रणेचीच असेल असेही नवीन चावला यांनी यावेळी स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा