कॉंग्रेसी बंडखोरांचा फायदा युतीलाच-मुंडे

वेबदुनिया

मंगळवार, 6 ऑक्टोबर 2009 (10:38 IST)
राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आघाडी केवळ कागदावरच राहिली असून दोन्ही पक्षांचे तब्बल दीडशे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने मतांचे हस्तांतरण होऊन त्याचा फायदा भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवाराला होईल. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत १९९५ ची पुनरावृत्ती होऊन राज्यात युतीला स्पष्ट बहुमत मिळेल असा ठाम विश्वास भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार गोपीनाथ मुंडे यांनी येथे व्यक्त केला. मंत्रालय, विधिमंडळ वार्ताहर संघाने येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आयोजिलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, या निवडणुकीत महागाई हा प्रमुख मुद्दा राहणार आहे. महागाईमुळे गरीब जनतेमध्ये आघाडी सरकारविषयी प्रचंड चीड निर्माण झाली असून येत्या १३ ऑक्टोबर रोजी राज्यातील जनता मतदानाद्वारे चीड व्यक्त करील असेही मुंडे म्हणाले.

ज्या दलित आणि मुस्लिम वर्गाचा पाठिंबा घेऊन आघाडी सरकार सत्तेत आले, त्यांचाच विश्वासघात केल्यामुळे राज्यात तिसरी आघाडी अस्तित्वात आली. तिसरी आघाडी काँग्रेस-राष्ट्रवादीची किमान १२ टक्के मते खेचून घेईल असेही मुंडे म्हणाले. त्यामुळे आघाडीला शंभर जागाही मिळणार नाहीत असेही त्यांनी सांगितले.

आघाडी सरकारच्या जाहीरनाम्यावर कडाडून टीका करत मुंडे म्हणाले की, या जाहीरनाम्यात २१ पैकी १३ मुद्द्यांमध्ये युतीच्या वचननाम्याची नक्कल केली आहे. यापूर्वी हे मुद्दे त्यांच्या जाहीरनाम्यात कधीच नव्हते. युतीचे मुद्दे उचलून आघाडी सरकार कशी काय सत्तेत येणार असा सवाल त्यांनी यावेळी केला. तथापि, राज्यात युतीची सत्ता आल्यास पुढील पाच वर्षात जीवनावश्यक वस्तुंचे भाव स्थिर ठेवू, भटक्या विमुक्तांसाठी वेगळे मंत्रालय स्थापन करू तसेच रेणके आयोगाची अंमलबजावणी करू असे मुंडे यांनी जाहीर केले.

वेबदुनिया वर वाचा