आज कामगार दिन. त्यानिमित्त ... विडी कामगारांच्या व्यथा

मंगळवार, 1 मे 2018 (15:05 IST)
बरेच दिवस माझी विद्यार्थिनी ज्योती कॉलेजमध्ये दिसली नाही. तिच्या मैत्रिणींकडे चौकशी केल्यावर कळलं की, तिला घरातून शिक्षणाची परवानगी नाही. पण काही दिवसांपूर्वी अचानक ज्योती कॉलेजमध्ये दिसली. मी तिला कॉलेजला न येण्याचं कारण विचारताच 'मॅडम, मला जगायचं नाही, मरायचं आहे. मी आत्महत्या करण्याचा विचार करते.' या तिच्या हेलावून टाकणार उत्तराने मी स्तब्ध झाले. कॉलेजच्या कॅन्टिनमध्ये बसून बराच वेळ रडून झाल्यावर ज्योती बोलू लागली...
 
'मॅडम, माझी आई आणि मी विड्या करून घर चालवत होतो. घरात दोन लहान भाऊ आहेत. वडील मिलमध्ये कामगार म्हणून काम करीत होते. आणि मिल बंद पडली तसं ते हळूहळू दारूच्या आहारी गेले. मग रोज दारू पिण्यासाठी आई आणि माझ्याकडे पैशांची मागणी करू लागले. मारहाण, उपासार हे रोजचेच झाले. आई दोन वर्षांपूर्वी वारली. आणि घर माझ्या एकटीवर येऊन पडले. शिक्षणाचा काहीही संबंध नसलेल्या माझ्या वडिलांनी मुलगी म्हणजे त्यांच्या दृष्टीने चूल आणि मूल इतकेच मर्यादित होते. वडिलांनी माझे लग्र एका अशा मुलाशी लावून दिले जो व्यसनी, बाहेरख्याली होता. 
 
सासरच्यांनी माझ्या शिक्षणावर बंदी आणली आणि विड्या करण्याची सक्ती करू लागले. बरं ज्याच्या जवळ मन मोकळं करावं तो नवरा मात्र व्यसनात, चुकीच्या संबंधात बुडालेला. शेवटी कंटाळून मी माहेरी आले.
 
मॅडम, आता समाजात विड्या करणार्‍या मुलींची व्यथा यापेक्षा वेगळी नाही. या विडी व्यवसायात महिला कामगारांचा अधिक सहभाग आहे. शहरातील गिरण्या बंद पडल्यामुळे, जागतिकीकरण, महागाई, आर्थिक मंदी याचा फटका विडी उद्योगातील कुटुंबीयांना बसला.
 
हजारो कामगारांची घरे चरितार्थ चालविण्यासाठी विडी उद्योगावर अवलंबून आहेत. या व्यवसायात त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मालकवर्गाकडून ठराविक विड्या वळण्याची सक्ती, कामाच्या मोबदल्यात कमी पगार, रजा नाही. अशा परिस्थितीत कामगार जगत असताना कुटुंबाची दैनंदिन उपजीविका भागविण्यासाठी नाईलाजाने लहान मुलांना शाळेत न जाता बांधकाम मजुरी, कामगार, हॉटेल कामगार, कपडे शिलाई कामगार, चादर कारखाना कामगार अशी कामे करावी लागतात. पर्यायाने मुले शाळेत न जाता बालमजूर म्हणून जगतात. मुलींना आईच्या हाताखाली विड्या वळण्याचे काम करावे लागते. आणि हळूहळू त्यादेखील शाळा सोडून विडी वळण्यात सक्रिय होतात.
 
विडी कामगार म्हणून जगण्यास सुरुवात करतात. विडीचे कार्ड असेल तर त्या मुलीचे लग्र लवकर होते. लग्रानंतर गरोदरपणातही तिला विड्या वळण्याचे काम करावे लागते. तंबाखूच्या सान्निध्यात काम करत असताना कर्करोग, क्षयरोग, रक्तात हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अगदी कमी पगारात काम करत आल्याने त्यांच्या कुटुंबाला निरक्षरता, गरिबी, बालकामगार आणि बालविवाह प्रथेचे वेष्टन आवळले गेले आहे. या निरक्षरतेमुळे विडी कागारांचे राहणीमान सुधारत नाही. जीवन उंचावत नाही. यामुळे समाजातील काम करणार्‍या विडी कामगारांचा विकास खुंटला आहे.
 
विडी कामगार ज्या परिसरात, झोपडपट्ट्यांमधून राहातात तो परिसर शहरातील गलिच्छ वस्ती म्हणून ओळखला जातो. येथे साठणारा तेंदूपत्तचा कचरा, अस्वच्छ घरे, उघडी असणारी ड्रेनेजस, शहरातील कारखान्यांमधून सांडपाण्याचे नाले यामुळे विडी कागारांना सतत आजारांना सामोरे जावे लागते.' ज्योती न थांबता बराच वेळ बोलत होती. तिच्या बोलण्यामधून विडी कागारांच्या व्यथा व त्यांच्या अवस्थेबद्दलचा तीव्र संताप व्यक्त होत होता.
 
खरंच, आज गरज आहे कामगारांचे आयुष्य आणि भविष्य सुधारण्यासाठी आवश्यक वेतन, मजुरी देण्याची. विडी कामगारांमध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण करण्याची आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन एक सुशिक्षित व सुसंस्कृत समाज निर्माण करण्याची.
प्रा. डॉ. वंदना भानप

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती