पेडगावचा धर्मवीर गड

शनिवार, 30 जून 2018 (15:18 IST)
मी तसा मूळचा श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव या गावचा. पेडगाव आमच्यापासून हाकेच्या अंतरावर, पण तरीसुद्धा कधी जाणं झालं नव्हतं. आम्ही महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक असं दरवर्षी कुठल्यातरी किल्ल्यावर शिवजयंतीला (19 फेब्रुवारीला) सायकलने प्रवास करतो. मागच्या वर्षी हा प्रवास बहाद्दूरगड अर्थात पांडे पेडगांवला करायचा, असं ठरलं. इंदापूर ते पांडे पेडगाव हे अंतर 70 कि.मीटर. पांडे पेडगाव म्हटले की, पेडगावचा शहाणा ही म्हण आपल्या लक्षात येते, छत्रपती शिवाजी महाराजांनी बहाद्दूर खानाला जो चकवा दिला तेव्हापासून 'पेडगावचा शहाणा' असं संबोधलं जातं.
 
पेडगावचा धर्मवीर गड हा भीमेच्या काठावर आहे. त्याच्यातील दक्षिणेकडील तटबंदी भीमा नदीला समांतर अशी आहे. साधारण आयताकृती आकाराच्या या किल्ल्याला तीन ते चार प्रवेशद्वारे आहेत. मुख्य प्रवेश हा पेडगाव श्रीगोंदा मार्गावरील गावाच्या बाजूला आहे. किल्ल्यामध्ये असलेल्या अनेक वास्तू आजही दिसतात, परंतु त्या अत्ंत उद्‌ध्वस्त अवस्थेत आहेत. याची तटबंदी कशीबशी का होईना पण उभी आहे. तरी सुद्धा काटेरी रान माजलेलं सगळीकडं दिसतं. नदीच्या बाजूला तटबंदीमध्ये जे बांधकाम आहे ते आजही बघण्यासारखं आहे. या दुमजली इमारतीच्या खिडक्यांमधून भीमानदीचा देखावा अत्यंत सुंदर दिसतो. किल्ल्यामध्ये सुबक नक्षीकाम असलेली अनेक मंदिरे आहेत. या मंदिरांपैकी लक्ष्मी-नारायण मंदिर तसे आजही बर्‍या अवस्थेत आहे. अर्थातच पुरातत्त्व खात्याने जवळ जवळ त्याचे पुनरुज्जीवन केलेले आहे. या मंदिरामध्ये अलिंकृत स्तंभ व मंदिरा बाहेरील मूर्ती या अत्यंत सुबक, सुंदर व देखण्या आहेत.
 
या दुमजली इारतीच्या खिडक्यांमधून भीमा तीरावरचा देखावा अत्यंत सुंदर दिसतो. अर्थात सध्या खूप मोठ्या प्रमाणात वाळू उपसा आहे. तरीसुद्धा किल्ल्याच्या आतील अनेक गोष्टी बघण्यासारख्या आहेत. जवळ जवळ 365 एकरामध्ये पसरलेला हा किल्ला असून किल्ल्यावर आजही अनेक विशेषतः प्राचीन अर्थात इ.स. पाचव्या शतकातील चालुक्य शैलीतील मंदिरं हत्तीच्या मोटा, राजदरबार, वेशी, तटबंदी आजही भग्न अवस्थेत आहेत.
 
छत्रपती संभाजी राजांचा जेथे अत्यंत क्रूरपणे छळ केला गेला ती जागा आज दाखवली जाते. ती जागा बघताना अर्थातच अंगावर शहारे येतात. आणि डोळ्यातून अश्रू वाहायला लागतात. एका मंदिराचा कुठलातरी खांब एक स्तंभ म्हणून प्रतीकात्मक म्हणून ठेवलेला आहे. येथे छत्रपती संभाजी राजांचं मोठं स्मारक व्हाला हवं. अर्थात पेडगाव गावच मुळात पेडगावच्या किल्ल्यांमध्ये वसलेलं आहे. बहाद्दूरखान हा औरंगजेबचा दुधभाऊ मानला जातो आणि त्याला जेव्हा दक्षिणेकडे औरंगजेबाने पाठविलेलं होतं त्यावेळी तो स्वतःला दक्षिणेचा शहेंशाह म्हणवून घेत असे. छत्रपती संभाजी राजांचं येथे स्मारक व्हायला हवं. म्हणजे संभाजी राजांनी जे अप्रतिम लिखाण केलं त्यावर एखादं ग्रंथालय व्हायला हवं, खरं तर संभाजी राजांचं एखादं अध्यासन येथे व्हायला हवं आणि राजांवर संशोधन करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी ही जागा अप्रतिम आहे. त्यासाठी येथे प्रयत्न करायला हवेत. केवळ एकच दिवस या गडाचं माहात्म्य न राहता वर्षभर तेथे राजांबद्दल काही ना काही कार्यक्रमांमधून म्हणजे चर्चासत्र, सेमिनार, वर्कशॉप, कार्यशाळा असं व्हायला हवं. तेथे आजही पहाटे नगारा वाजविला जावा असं वाटायला लागतं.
 
जुन्या मंदिराचे जे खांब आहेत ते खांब काही घरांच्या बांधकामासाठी वापरलेले दिसतात. खरं तर अत्यंत मेहनतीने चालुक्य काळामध्ये या वास्तू उभ्या केलेल्या होत्या. यातील वीरगळी, सतीचे खांब हे अत्यंत बघण्यासारखे आहेत. मूर्तीशास्त्र जे आहे त्या शास्त्राप्रमाणे अनेक मूर्ती तयार केलेल्या आहेत. तेथील लक्ष्मी-नारायण मंदिराच्या बाहेरील मूर्ती शास्त्रप्रमाणे आहेत. मंदिरांचा नीट अभ्यास व्हायला हवा. प्रत्येक मूर्तीचे जे अलंकार आहेत ते वेगवेगळे आहेत. म्हणजे कर्णालंकार जे आहेत ते प्रत्येक मूर्तीचे वेगवेगळे आहेत. खरं तर याचा अभ्यास व्हायला हवा.
 
गडगिरीमध्ये गड तर बघू यात. पेडगावसारखे भुईकोट किल्लेसुद्धा महाराष्ट्रात अनेक आहेत. त्याला स्थलदुर्ग असं समजलं जातं. असे स्थलदुर्ग आडबाजूच्या पायवाटेने जाऊन बघण्यासारखे आहेत. सायकलवरून गडावर गेलो तेव्हा जेवणाची आमची उत्तम सोय बहाद्दूरगडाधल्या एका कुटुंबाने केली होती. आम्ही जवळ जवळ 150 जण होतो. आणि या सगळ्यांची घरगुती पद्धतीनं उत्तम शाकाहारी जेवणाची सोय त्यांनी केलेली होती. 
 
पुन्हा एकदा कधीतरी हा गड निवांतपणे बघण्याची इच्छा आहे. चला तर गडगिरी करू यात, बघू यात.
डॉ. संजय चाकणे

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती