Chaitra Navratri विशेष महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवी मंदिरांना देऊ शकता भेट
रविवार, 30 मार्च 2025 (07:30 IST)
श्री महालक्ष्मी कोल्हापूर- महाराष्ट्रातील कोल्हापूर मध्ये असलेले श्री महालक्ष्मी मंदिर हे एक जागृत देवस्थान आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी ही अंबाबाई म्हणून ओळखली जाते. तसेच श्री महालक्ष्मी अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मुख्य शक्तीपीठ म्हणजे कोल्हापूरची अंबाबाई होय.
श्री तुळजाभवानी तुळजापूर- महाराष्ट्रातील तुळजापूर मध्ये असलेली तुळजाभवानी ही साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पीठ मानले जाते. तुळजापुरातील तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र हे पूर्ण आणि आद्यपीठ मानले जाते. तसेच स्वराज्य हिंदवीचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज भोसले यांची कुलदेवी देखील हीच तुळजाभवानी आहे.
श्री रेणुका देवी माहूर- महाराष्ट्रातील माहूरगड मध्ये असलेली रेणुका देवी ही साडेतीन शक्तिपीठांपैकी एक एक पीठ असून जागृत देवस्थान आहे. रेणुका मातेच्या मंदिरात नवरात्री मोठ्या उत्साहात साजरी होते.
श्री सप्तशृंगी देवी वणी- साडेतीन शक्तिपीठांपैकी असलेले अर्धे शक्तीपीठ म्हणजे वणीची सप्तशृंगी देवी होय. महाराष्ट्रातील नाशिकजवळ असलेले वणी हे सप्तशृंगी देवीचे निवासस्थान आहे. अतिशय जागृत देवस्थान म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
श्री योगेश्वरी देवी अंबाजोगाई- महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात असलेले अंबाजोगाई मध्ये स्थित योगेश्वरी देवीचे मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. तसेच हे मंदिर बीड मधील सर्व प्रतिष्ठित मंदिरांपैकी एक मंदिर आहे. योगेश्वरी मंदिर हे देवी योगेश्वरीला समर्पित आहे.
श्री एकविरा देवी धुळे- महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात देवपूर या उपनगरात असलेल्या तसेच सुर्यकन्या तापी नदीची उपनदी म्हणून ओळखल्या जाणा-या पांझरा नदीच्या तीरावर आदिमाया एकवीरा देवीचे अतिप्राचीन मंदीर आहे. नवसाला पावणारी, स्वयंभू अशी ही देवी असल्याची भाविकांची श्रध्दा आहे.
श्री मनुदेवी जळगाव- महाराष्ट्रातील यावल-चोपडा मार्गावर आडगाव गावापासून आठ किलोमीटर असलेले मनुदेवीचे अतिप्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. तसेच सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या या मंदिरातील मनुदेवीला सातपुडा निवासिनी म्हणून देखील ओळखले जाते.
श्री महालक्ष्मी देवी डहाणू - मुंबई अहमदाबाद महामार्गावर डहाणू रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर असणाऱ्या महालक्ष्मीचे हे देवस्थान जागृत आहे. तसेच डहाणूची महालक्ष्मी हे एक जागृत देवस्थान असून भक्ताच्या हाकेला धावणारी देवी आहे. या देवीची यात्रा चैत्र शुद्ध पौर्णिमेपासून म्हणजेच हनुमान जयंतीपासून पुढे 15दिवस चालते.
मुंबादेवी मुंबई- मुंबईचे मुंबा देवी मंदिर महाराष्ट्रातच नाही तर देशभरात खूप प्रसिद्ध आहे. मुंबादेवी मंदिर मुंबईच्या भुलेश्वर, येथे आहे.हे मंदिर सुमारे 400 वर्ष जुने आहे. या मंदिराची स्थापना कोळी बांधवानी केली आहे.
मांढरदेवी काळुबाई सातारा- महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्रीकाळेश्वरी म्हणजेच काळूबाई ही देवी नवसाला पावणारी आहे. तसेच गर्द करवंदीच्या वनराईत विराजमान असलेल्या काळूबाईचे स्थान शंभू-महादेवाच्या डोंगर रांगेत पुणे-साताऱ्या जिल्हा तसेच वाई भोर-खंडाळा या तीन तालुक्यांच्या सरहद्दीच्या शिखरावर वसलेले आहे.
जीवदानी देवी विरार- महाराष्ट्रातील विरारमध्ये डोंगरावर वसलेले सर्वात महत्त्वाचे ठिकाण म्हणजे आई जीवदानी देवीचे मंदिर आहे. तसेच विरार मध्ये असलेले हे 150 वर्ष जुने आई जीवदानी मंदिर हजारो भक्तांचे श्रद्धास्थान आहे.