Maharashtra Tourism : श्री गिरिजात्मक लेण्याद्री हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील अष्टविनायकांपैकी एक प्रसिद्ध गणपती मंदिर आहे. हे मंदिर लेण्याद्रीच्या डोंगरावर, बौद्ध गुहांच्या संकुलातील ८ व्या गुहेत स्थित आहे. या मंदिराला गिरिजात्मक असे नाव आहे, कारण गणपती हा पार्वती (गिरीजा) यांचा पुत्र मानला जातो. श्री गिरिजात्मक हा गणपती अष्टविनायक पैकी सहावा गणपती होय. तसेच हे अष्टविनायकांमधील एकमेव मंदिर आहे जे डोंगरावर आहे आणि येथे पोहोचण्यासाठी ३०७ पायऱ्या चढाव्या लागतात.
मंदिराची वैशिष्ट्ये-
लेण्याद्री बुद्ध लेणी सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये आहे. मंदिर पूर्णपणे दगडात कोरलेले आहे, त्यामुळे येथे प्रदक्षिणा करता येत नाही. मंदिर दक्षिणाभिमुख आहे, परंतु गणपतीची मूर्ती उत्तराभिमुख आहे, म्हणजे दर्शन घेताना प्रथम गणपतीच्या पाठीचे दर्शन होते. गणपतीची मूर्ती सोंड डावीकडे असलेली आहे. मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूस हनुमान आणि शिवशंकर यांच्या मूर्ती आहे. मूर्तीची नाभी आणि कपाळ हिरेजडित आहे. तसेच मंदिराची रचना अशी आहे की सूर्यप्रकाशामुळे दिवसभर मंदिरात उजेड असतो, त्यामुळे येथे विद्युत दिव्यांची गरज नाही.
पौराणिक कथा-
गणेश पुराणानुसार देवी सतीने पार्वतीचा अवतार घेऊन गणेशाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी तिने लेण्याद्री पर्वतावर अतिशय घोर तप केले. भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी देवी पार्वतीने स्वतःच्या अंगाच्या मळापासून मूर्ती बनविली. गणपतीने या मूर्तीमध्ये प्रवेश केला आणि तो तिच्या समोर सहा हात आणि तीन डोळे असलेला बालक म्हणून प्रविष्ट झाला. असे म्हणतात की गिरिजात्मक या अवतारात गणपती लेण्याद्रीवर १५ वर्षे राहिला. या अवतारात त्याने अनेक दैत्यांचा संहार केला.
मंदिर परिसर-
मंदिर परिसरात १८ गुहा आहे, ज्यामध्ये मुख्य मंडप (सभा मंडप) आहे. या मंडपात ५१ फूट रुंद आणि ५७ फूट लांब असा प्रशस्त हॉल आहे, ज्याला खांबांचा आधार नाही. येथे बौद्ध भिक्खूंसाठी पाण्याच्या चार टाक्या आहे. मंदिरात प्रवेशासाठी दगडात कोरलेल्या पायऱ्या आणि व्हरांडा आहे. येथील गुहा क्रमांक १४ मध्ये चैत्यगृह आहे, ज्यावर शिलालेख कोरलेला आहे.