वीकेंडच्या ‘सर्च’मध्ये लोणावळ्याला पसंती

सोमवार, 18 ऑगस्ट 2014 (16:42 IST)
धुक्याच्या दुलईत लपलेल्या डोंगरदर्‍या अन् कडय़ांवरून कोसळणार्‍या धबधब्यांमुळे निर्माण झालेल्या आल्हाददायक वातावरणाला भुलणार्‍या पर्यटकांनी ‘लोणावळ्या’ला अव्वल पर्यटनस्थळाचा मान दिला आहे. मागील तीन महिन्यांमध्ये राज्यातील पर्यटकांनी ‘गुगल’वर सर्वाधिक सर्च लोणावळ्यासाठी केला असून, त्यापाठोपाठ महाबळेश्वर आणि माथेरानचा क्रमांक लागतो.
 
गुगलने पावसाळी पर्यटन स्थळांसाठी पर्यटकांनी मागील तीन महिन्यांमध्ये कोणती माहिती मागविण्यात आली, याचे मूल्यांकन केले आहे. त्यात सर्वाधिक सर्च लोणावळ्यासाठी झाल्याचे दिसून आले आहे. नयनरम्य निसर्ग सौंदर्य आणि सर्वोत्तम कनेक्टिव्हिटी या दोन कारणांमुळे पर्यटकांनी लोणावळ्याला प्राधान्य दिल्याचा निष्कर्ष गुगलने काढल्याचे कंपनीच्या पारूल बत्रा यांनी दिली.
 
पावसाळ्याचे वेध लागल्यानंतर ‘वीकेंड ट्रीप’च्या आयोजनांना वेग येतो. बहुतांश पर्यटक जून ते सप्टेंबरदरम्यान दोन ते तीन दिवसाच्या छोटय़ा सहलींना प्राधान्य देतात. या धर्तीवर पर्यटनाचा ट्रेंड जाणून घेण्यासाठी ‘गुगल’ने विशेष ‘सर्च’ मोहीम राबवली. त्यानुसार पावसाळ्यामध्ये पर्यटकांकडून सर्च इंजिनवर धबधबे, अभयारण्ये, किल्ले आणि समुद्रकिनार्‍याबाबत सर्वाधिक विचारणा होते. यंदाच्या पावसाळ्यात पर्यटकांनी लोणावळ्याबद्दल खूप विचारणा केल्याचे दिसून आले आहे. 
 
सर्च देणार्‍यांमध्ये मुंबई आणि पुण्यातील पर्यटकांचा क्रमांक वरचा आहे. लोणावळ्याबरोबरच एकपेक्षा अधिक दिवसांच्या सहलीसाठी महाबळेश्वर आणि माथेरानचाही पर्याय पुढे आल्याचे दिसून आले आहे.

वेबदुनिया वर वाचा