किल्ले वेताळवाडी

शुक्रवार, 4 सप्टेंबर 2015 (11:34 IST)
उभ्या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरील टप्प्याटप्प्यावर अनेक लहान-मोठय़ा डोंगरमाथ्यांना त्यांच्या उपयुक्ततेनुसार, विविध राजसत्तांच्या कालखंडात गड-किल्ल्यांचे साज चढले. यापैकीच एक उत्तम नमुना म्हणजे किल्ले वेताळवाडी! अप्रतीम अवशेषांनी संपन्न असा हा किल्ला पर्यटकांचे एक आकर्षण बनला आहे. 
 
चाळीसगावच्या दिशेने जाताना प्रथम सुतोंडा किल्ला लागतो तो पाहून झाल्यावर सोयगावहून वेताळवाडीकडे जाता येते. वेताळवाडी गावाजवळ येताच समोरच्या डोंगरावरचे तट-बुरूजांचे लक्षवेधी अवशेष दिसू लागतात. त्याच डोंगराला वळसा घालून वळणदार हळद्या घाटानं किल्ल्याच्या दक्षिण पायथ्याशी जाता येते. दक्षिणेची सलग तटबंदी आणि टप्प्याटप्प्यावर लहान मोठय़ा बुरूजांचे कोंदण फारच लक्षवेधी होते. थोडे पुढे गेल्यावर किल्ल्याचे खरे सौंदर्यं खुलून दिसते.
 
पहिल्या महादरवाज्यात पाऊल पडताच करकरीत तटबंदी, अवाढव्य बुरूजांचा भरभक्कम पहारा, बुरूजांच्या आत असलेली दारू कोठाराची अनोखी रचना पाहून डोळ्याचे पारणे फिटते. मुख्य डोंगरावरील व्याघ्रशिल्प प्रेक्षणीय होते.
 
पहारेकर्‍यांच्या देवडय़ा ऐसपैस आणि चांगल्या स्थितीत आहेत. शत्रूवर मारा करण्यासाठी प्रत्येक तट-बुरुजात जंग ठेवलेल्या, तसेच विविध जागी गुप्त खिडक्या ही पाहायला मिळतात. त्यानंतर दिसतो तो बालेकिल्ला. डावीकडे वटवाघळांच्या वास्तव्याचे खांबटाके दिसतात. उजवीकडे पहारेकर्‍यांचा बुरुज दिसतो. या किल्ल्यासारखी भक्कम तटबंदी दुसरीकडे क्वचितच पाहायला मिळेल. 
 
माथ्यावर सुंदर नक्षीकाम असणारी गोल झरोका असणारी घुमटासारखी उद्ध्वस्त वास्तू दिसते. माथ्यावर सर्वत्र सीताफळाची झाडे असून त्यांची सावली सुखद वाटते. 
 
पश्चिमेला वेताळवाडी धरणाचे विहिंगम दृश्य दिसते. पलीकडे वैशागड आहे. पश्चिमेचा महाकाय बुरूज आणि अवाढव्य द्वाराची बांधकामं भव्य  दिव्य दिसतात. 
 
आकाराने मध्म असूनही कातळशिल्पांनी अगदी मनापासून सजवलेला हा किल्ला पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून येऊ लागले आहेत. बालेकिल्ल्यातील अंबरखान्याची इमारत आकर्षण आहे. जवळच नमाजगीर नावाची इमारत सुंदर नक्षीकामाने सजलेली आहे. 
 
म. अ. खाडिलकर 

वेबदुनिया वर वाचा