अजित पवारांसाठी राजकीय कसोटीचा काळ, कशी पार करतील 'ही' 3 मोठी आव्हानं?
बुधवार, 7 ऑगस्ट 2024 (10:48 IST)
"माझी लाडकी बहीण योजना टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगत आहेत. परंतु, अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे. तोच माझा स्वाभिमान आहे," असं म्हणत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुकलंय.
मात्र, पाचवेळा उपमुख्यमंत्री बनलेल्या अजित पवारांसाठी आगामी विधानसभा लढाई तितकीशी सोपी राहिलेली नाही. याउलट त्यांच्यासमोर अनेक मोठी आव्हानं आहेत, जी यशस्वीरित्या पार न केल्यास त्यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकतं, असं राजकीय विश्लेषक सांगतात.
याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी खासगी राजकीय रणनितीकार नियुक्त केल्याची माहिती आहे. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. यात पक्षाचा निवडणुकीचा प्रचार, सोशल मीडियावरील वावर, पत्रकार परिषदेतील मुद्दे, आमदारांनी मतदारसंघात कोणते कार्यक्रम घ्यावे असे अनेक मुद्दे आहेत.
याचाच भाग म्हणून येत्या 8 ऑगस्टपासून उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार राज्यभरात 'जनसन्मान यात्रा' काढणार आहेत. यावेळी ते सरकारी योजनांची माहिती घेऊन जनतेपर्यंत पोहोचतील.
लोकसभेतील अनपेक्षित निकाल आणि पक्षाची प्रतिमा सकारात्मक करण्याच्यादृष्टीने अजित पवार यांच्यासाठी हा प्रचार दौरा महत्त्वाचा तर आहेच, परंतु याशिवाय अजित पवार यांना आपल्यासमोर असलेल्या आव्हानांना पार करण्यासाठी पुढचे अडीच महिने त्यांच्यासाठी 'परीक्षेचा' काळ असल्याचं विश्लेषक सांगतात.
अजित पवार यांच्यासमोर आजच्या घडीला कोणती आव्हानं उभी ठाकली आहेत, यावर नजर टाकूया.
1. प्रतिमा सकारात्मक करण्याचं आव्हान
अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. ज्यात त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, युवा कार्य प्रशिक्षण योजना अशा 'लोकप्रिय' योजना जाहीर केल्या.
मध्य प्रदेशमध्ये मतदारांमध्ये 'लोकप्रिय' ठरलेली आणि तिथल्या भाजप सरकारसाठी निवडणुकीत फायदेशीर ठरलेली 'लाडली बहन योजना' महाराष्ट्रात आणली गेली. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' असं महाराष्ट्रातील योजनेचं नामकरण करण्यात आलं.
मात्र, या योजनेच्या नावात 'मुख्यमंत्री' शब्द असल्यानं महायुतीतल्या भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 'राजकीय क्रेडिट' घेताना तारांबळ उडताना दिसतेय.
शिवाय, या योजनेचं श्रेय घेण्याबाबतही महायुतीतल्या पक्षांमध्ये एकप्रकारची स्पर्धा दिसून येते. कारण या 'लोकप्रिय' योजनेचा राजकीय फायदा कुणाला होईल, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला आलेला आहे.
हाच प्रश्ना माध्यमांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला विचारला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'जनसन्मान यात्रे'बाबतच्या नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत लाडकी बहीण योजनेचा उल्लेख बॅनरवरती करण्यात आला होता, मात्र यात 'मुख्यमंत्री' हा शब्द टाळल्याचं दिसलं.
तसंच, अजित पवार यांनीही स्वतः या योजनेसंदर्भात नुकतीच एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केली, त्यातही त्यांनी 'मुख्यमंत्री' हा उल्लेख केलेला नाही. याउलट त्यांनी आपण अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून ही योजना यशस्वी करून दाखवणार आहोत, यावर भर दिला.
अशा परिस्थितीत अजित पवार यांना वित्तमंत्री म्हणून योजनांसाठी केलेलं आर्थिक नियोजन, विविध योजना या जनतेपर्यंत पोहोचवणंही महत्त्वाचं होतं.
शिवाय, भाजपसोबत युती केल्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूळ विचारधारेबाबतही जनतेत पुन्हा जोरात प्रचार केला पाहिजे किंवा 'शाहू-फुले-आंबेडकर' हीच विचारधारा पक्षाचा गाभा आहे, जो युतीत आल्यानंतर बदलला नाही हा संदेश लोकांपर्यंत रुजवावा लागेल असं मत स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी मांडलं होतं.
भाजपसोबत गेल्यानंतर राष्ट्रवादीला पुन्हा एकदा आपला परंपरागत मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचंही यातून दिसून येतं.
या सर्वच कारणांसाठी अजित पवार यांची ही यात्रा आणि या यात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत योजनांसह आपली विचारधारा पोहोचवण्याचं काम करण्याचं नियोजन आहे.
या जनसन्मान यात्रेचा टीजर नुकताच प्रकाशित करण्यात आला. यात 'सन्मान के बदले जान भी दे तो नही है घाटा रे!' हे गाणं वापरण्यात आलं आहे. यात अजित पवार यांनी "आम्ही शब्दांचे पक्के आहोत, आम्ही जो वादा करतो तो पुराच करतो" असं म्हटलं आहे.
तसंच, या यात्रेच्या माध्यमातून सन्मान, संवाद, सशक्तीकरण हे मुद्दे डोळ्यासमोर असतील, असाही उल्लेख करण्यात आला आहे.
अजित पवार 8 ऑगस्टपासून नाशिकमधून जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून निवडणूक प्रचाराची सुरुवात करतील. जनसन्मान यात्रा ही सुरुवातीला उत्तर महाराष्ट्र, नंतर विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणाच्या जिल्ह्यांमध्ये आणि प्रत्येक मतदारसंघात 31 ऑगस्टपर्यंत काढण्यात येणार आहे.
वरिष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी सांगतात, "अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्त्वाची लढाई आहे. ते सध्या डगमगले आहेत. समजा येत्या विधानसभेत कमी जागा आल्या आणि मविआ सत्तेवर आली तर ही त्यांची शेवटची राजकीय लढाई असेल आणि त्यांच्या राजकीय एक्झिटची सुरुवात असेल. यामुळे पुढचे अडीच महिने त्यांच्यासाठी राजकीय प्रवास खडतर असेल."
ते पुढे सांगतात, "त्यांनी खासगी पीआर एजन्सी नेमली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत. हे आगितकतेचं लक्षण आहे. त्यांचं सलग पिंक जॅकेट घालणं असेल, किंवा केडरला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागतोय हे यातून दिसत आहे. यामुळे त्यांना लोकांमध्ये जावून आपल्या प्रतिमेवर काम करावं लागेल. कारण त्यांची प्रतिमा आतापर्यंत सुरुवातीला भ्रष्टाचाराचे, घोटाळ्याचे आरोप, नंतर सत्ता केंद्रीत राजकारण आणि यानंतर भाजपच्या हातात पक्षाचं अस्तित्त्व देणं, शरद पवारांना दगा देणं अशीही टीका झाल्याने या नकारात्मक प्रतिमेवर त्यांना काम करावं लागेल."
तर ज्येष्ठ पत्रकार संजय जोग याविषयी बोलताना सांगतात, "अर्थात अजित पवार यांच्यासाठी आगामी काळ कठीण आहे. लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना 13 जागा मिळतील असं चित्र होतं. पण प्रत्यक्षात मिळाल्या केवळ 4 जागा आणि त्यातही निवडून आली केवळ एक जागा. तसंच, स्वतःच्याच काकांचा कुठेतरी विश्वासघात करून ते सत्तेत सामील झाले असाही एक संदेश किंवा प्रतिमा जनतेत गेल्याने त्याबाबत लोकांमध्ये असंतोष आहे.
"यामुळे अजित पवार यांना आपली जुनी प्रतिमा वाचवावी लागणार आहे. ती म्हणजे शाहू, फुले, आंबेडकर ही प्रतिमा जपावी लागणार आहे. भाजपसोबत असूनही दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लीम मतदार पुन्हा मिळवण्यासाठी काम करावं लागणार आहे."
अजित पवार यांनी पक्षात बंड करून आता वर्ष उलटलं. त्यांनी दावा केल्याप्रमाणे त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदारही मोठ्या संख्येने आले.
सुमारे 40 आमदारांचं समर्थन आपल्यासोबत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आतापर्यंत अनेकदा सांगितलं आहे. परंतु लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता मात्र अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार काय निर्णय घेणार? हा मोठा प्रश्न आहे.
अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये नुकतंच मोठ्या संख्येने माजी महापौर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. विधानसभेच्या तोंडावर पिंपरी चिंचवडमधून 4 पदाधिकारी आणि 24 जणांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
हेच आव्हान अजित पवार यांच्यासमोर आताही कायम आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्यासोबत असलेले आमदार त्यांच्यासोबत कायम राहणार की पुन्हा शरद पवार यांच्याकडे परतणार? हा ही प्रश्न आहे.
लाल रेषफोटो स्रोत,GETTY IMAGES
राज्यावर लाखो कोटींचं कर्ज आणि शिंदे सरकारचा जाहिरातींवर 270 कोटी खर्च
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्याविषयी या गोष्टी जाणून घ्या
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना काय आहे? तुम्हाला याचा लाभ मिळू शकतो का?
3 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेले आजोबा थेट शिंदे सरकारच्या जाहिरातीत दिसले
ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या तीर्थ दर्शन योजनेवर मुस्लीम नेत्यांचा आक्षेप, पात्रता काय? अर्ज कसा करायचा?
सुधीर सूर्यवंशी सांगतात, "राष्ट्रवादी काँग्रेस हा मराठ्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. तसंच, धर्मनिरपेक्ष विचारधारा म्हणून त्यांची व्होट बँक आहे. आता मराठा लीडर म्हणून पक्षाचा चेहरा शरद पवार आहेत. भाजपसोबत गेल्याने अजित पवारांच्या. राष्ट्रवादीला आपल्या मूळ विचारधारेशी तडजोड करावी लागली असा संदेश गेला. त्यामुळे पक्षाची आता नेमकी व्होट बँक कोणती? असा गोंधळ आहे. याच कारणासाठी त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांसमोरही हा प्रश्न कायम आहे. कारण निवडून येण्याच्या दृष्टीने आमदार त्यांचे निर्णय घेणार."
तसंच, "अजित पवार लोकसभेला बारामतीत निवडून येऊ शकले नाहीत, किंवा शरद पवार यांच्यासमोर टिकाव लागणार नाही असाही मेसेज पक्षात गेल्याने आमदार याचाही विचार करतील," असंही ते सांगतात.
म्हणूनच या यात्रेच्या माध्यमातून महिला, मुस्लीम मतदार पुन्हा आपल्याकडे वळवण्याचा अजित पवारांचा प्रयत्न दिसत आहे.
3. युतीत टिकून राहून जागांसाठी वाटाघाटी करण्याचं आव्हान
लोकसभा निकालानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबत आणखी एक राजकीय विश्लेषण केलं गेलं, ते म्हणजे, 'अजित पवार गटाचा युतीला फारसा काही फायदा होऊ शकलेला नाही.'
यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) सलग दोनवेळा लोकसभेच्या निकालाचं खापर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर फोडलं. यामुळे आगामी काळात युतीत टिकून रहाणं आणि भाजपसोबत जागा वाटपात वाटाघाटी करणं हे अजित पवार यांच्यासाठी सोपं नाही.
आरएसएसचे मुखपत्र असलेल्या 'द ऑर्गनायझर'मध्ये महिन्याभरापूर्वी अजित पवार यांच्यासोबतची युती आणि काँग्रेस नेत्यांना सोबत घेतल्याने लोकसभा निवडणुकीत भाजपचं नुकसान झालं या पद्धतीचं विश्लेषण करण्यात आलं होतं.
हे प्रकाशित होऊन महिनाही उलटला नाही तोवर आरएसएसशी संबंधित साप्ताहिक 'विवेक'मध्ये "भाजपचं केडर, हिंदुत्व मानणारा कार्यकर्ता आज खचलेला नाही, तर हरवलेला आहे, संभ्रमात आहे" असं म्हटलं आहे.
"कार्यकर्ता खचलेला नाही, तर संभ्रमात!" या मथळ्याखाली छापलेल्या लेखात राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्याने भाजपला लोकसभा निवडणुकीत अपयश आल्याचं म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकीसाठीही राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह असलेल्या जागा त्यांना शेवटपर्यंत मिळाल्या नाहीत याउलट भाजपने दिलेल्या जागांवर त्यांना समाधान मानावं लागलं असंही दिसलं.
याविषयी बोलताना सुधीर सूर्यवंशी सांगतात, "राष्ट्रवादीला केंद्रात मंत्रिपद दिलं गेलं नाही आणि यांनीही त्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचं दिसलं नाही. यातूनच त्यांचं महत्त्व किती आहे हे यातून स्पष्ट होतं."
तसंच, "लोकसभेला ही त्यांनी वाटाघाटी केल्या नाहीत. भाजपने ज्या जागा दिल्या, त्या त्यांना घ्याव्या लागल्या. उमेदवारही त्यांनी ठरवले. पक्ष कोण चालवत आहे हे यातून दिसलं. भाजपसोबत आहेत, तोपर्यंत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं अस्तित्त्व आहे. नाहीतर त्यांचं अस्तित्त्व धोक्यात येऊ शकतं," असंही सूर्यवंशी सांगतात.