कुंभमेळ्यात कोट्यावधी भाविक सहभागी होतात. त्यात अनेक विद्वान, संन्यासी, विविध पीठांचे शंकराचार्य, 13 आखाडय़ांचे साधुसंत, महात्मा यांची उपस्थिती प्रमुख असते.
समुद्र मंथनाने जो अमृतकुंभ निघाला तेव्हा देवांना प्रश्न पडला की, जर दानवांनी हे अमृत प्राशन केले तर दानव अमर होऊन देव आणि मनुष्य यांना सळो की पळो करून सोडतील. तेव्हा देवांनी इंद्राचा पुत्र जयंत याला अमृतकुंभ घेऊन आकाशमार्गे पलायन करायला सांगितले. या अमृतकुंभाला देवापासून हस्तगत करण्यासाठी दानवांनी देवाशी 12 दिवस घनघोर युद्ध केले. या युद्धकाळी अमृतकुंभापासून काही थेंब पृथ्वीवर पडले. हे अमृताचे थेंब हरिद्वार, प्रयाग, उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर येथे पडले. चंद्राने कलशामधून अमृत सांडताना वाचविले. सूर्याने अमृत कलशास फुटू दिले नाही. बृहस्पतीने राक्षसापासून रक्षण केले म्हणून जेव्हा सूर्य, चंद्र, गुरू कुंभ राशीत प्रवेश करतात तेव्हा कुंभमेळा भरतो.
त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थात अस्थिंचा विलय होतो असं मानलं जातं. श्रद्धादिक कर्मे कुशावर्त तीर्थावर केल्याने पितरांचा उद्धार होतो असे धर्मग्रंथ सांगतात. श्रीराम वनवासात असताना पंचवटीत त्यांचा मुक्काम होता. तेव्हा कश्पयऋषींनी श्री रामाला त्र्यंबकेश्वरी कुशावर्त तीर्थावर जाऊन पितरांच्या मुक्तीसाठी श्रद्धादिक कर्मे करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार श्रीरामाने इथे हे कर्म केले.