माणसांच्या स्वभावगुणानुसार त्याचा आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टीकोन बदलत असतो. स्वतःहून आखलेल्या नियमानुसार आयुष्य जगण्याचा अनेकजण प्रयत्न करतात, या नियमात अनेकजण यशस्वी होतात तर काही फसतात. मनोज कोटियन दिग्दर्शित 'करार' या सिनेमात 'आयुष्य' आणि 'नियम' या दोन गोष्टी अधोरेखित केलेल्या दिसून येतात. जीवनात यशस्वी होण्याकरिता स्वतःशी प्रामाणिक करार करणाऱ्या सुनील मोकाशी या एका इन्शुरन्स एजंटची ही कथा आहे. भविष्यात त्याला मोठा अधिकारी बनायचे असल्यामुळे, वर्तमानामध्ये अनेक तडजोडी करण्याची त्याची तयारी आहे. त्यासाठी स्वतःच्या बायकोच्या भावनांचा देखील तो विचार करत नाही. सुनीलची पत्नी जयूला आई व्हायचे आहे.
मात्र आपल्या नियमात मूल बसत नसल्याचे सांगत सुनीलने तिला अनेक वर्ष मातृत्वापासून वंचित ठेवले आहे. आपल्या या करारबद्ध पतीच्या स्वभावामुळे जयू मनोमन दुखावते. त्यांच्याकडे घरकामासाठी राधा ही एक विधवा महिला कामाला आहे. स्वभावाने मायाळू असणारी ही राधा जयुची चांगली मैत्रीणदेखील आहे. बाहेरगावी शिक्षणासाठी पाठवलेल्या आपल्या मुलाच्या संगोपनासाठी ती या दाम्पत्यांच्या घरी कामाला आहे. ही राधा जयुचे दुखणे जाणून घेत तिला वेळोवेळी धीर देण्याचे काम करते.
कालांतराने सुनीलचे स्वप्न पूर्ण होते. अनेकवर्ष कुटुंबनियोजन करणारे हे दाम्पत्य आता संततीचा विचार करून लागतात. मात्र, आता जयू मातृत्वासाठी परिपूर्ण नसल्याचे समजते. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने सरोगसी मदरचा विचार केला जातो. संततीसाठी भाड्याने मातृत्व आणण्याची आधुनिक संकल्पना जयू आणि सुनील राधाला बोलून दाखवतात. त्याबदल्यत योग्य ते आर्थिक सहाय्य करण्याचा 'करार' सुनील तिच्यासोबत करतो. मुलाच्या भावी आयुष्यासाठी राधादेखील या कराराला समंती दर्शवते. अशाप्रकारे सरोगसी मदरची मोठी जबाबदारी राधा घेते. मात्र काही महिन्यांनी सुनील नवा ‘करार’ तिच्यासमोर आणून ठेवतो. त्याच्या या कराराच्या अतिरेकामुळे पत्नी जयू आणि राधाच्या आयुष्यात काय परिणाम होतात हे या सिनेमात पाहायला मिळेल.