गिरणी कामगार, शिक्षणाचा बट्याबोळ या समस्यांबरोबरच सध्या महाराष्ट्रात विकासाच्या नावाखाली शेतकर्यांच्या जमीनी बळकावण्याचे काम पद्धतशीरपणे सुरु आहे. उद्योगपतींच्या मांडीला मांडी लावून बसणारे राजकारणी शेतकर्यांच्या तोंडाला फक्त आश्वासनांची पानेच पुसत आहेत. हाच विषय घेऊन खेळ सातबाराचा, खेळ संपणार कधी हा मराठी चित्रपट १६ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
भाऊसाहेब भोईर निर्मित आणि अजित शिरोळे दिग्दर्शित या चित्रपटात संदीप कुलकर्णी कणखर जिल्हाधिकार्याच्या भूमिकेत दिसणार आहे. रत्नाकर खोब्रागडे नावाचा हा जिल्हाधिकारी गावातील गरीब शेतकर्याकडून जबरदस्तीने पॉवर ऑफ ऍटर्नी घेऊन जमीनी बळकावणारे स्थानिक गुंड व यात सामिल असलेल्या सरपंच, आमदार ते थेट उद्योगपतींपर्यंत धडक मारतो आणि भूमीहीन होणार्या शेतकर्यांच्या बाजूने उभा रहातो. चित्रपटाची कथा निर्माते भाऊसाहेब भोईर यांनीच लिहिलेली असून पटकथा संवाद संजय पवार यांचे आहेत. चित्रपटाला संगीत हृदयनाथ मंगेशकर यांनी दिले असून लता मंगेशकर, आशा भोसले आणि बैजनाथ मंगेशकर यांनी गीते गायली आहेत.
चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात कवी ग्रेस यांच्या निवडक कवितांच्या ओळी प्रसंगानुरूप वापरलेल्या आहेत. संदीप कुलकर्णीसोबत चित्रपटातील अन्य कलाकार आहेत प्रतीक्षा लोणकर, शर्वरी जमेनीस, अनंत जोग, मोहन आगाशे, गिरीश ओक आणि मोहन जोशी.