एलिझाबेथ एकादशी

शनिवार, 1 नोव्हेंबर 2014 (12:08 IST)
भारताची ऑस्करसाठीची अधिकृत प्रवेशिका ठरलेल्या ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या बहुचर्चित चित्रपटानंतरचा दिग्दर्शक परेश मोकाशी याचा पुढचा चित्रपट ‘एलिझाबेथ एकादशी’ हा आहे. 14 नोव्हेंबर या बालदिनी बालकांचे भावविश्व साकारणारा चित्रपट प्रदर्शित होईल. गोवा येथील भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय पॅनारोमा या विभागाचे उद्घाटन याच चित्रपटाने होईल. याबाबत परेश मोकाशी सांगत होता. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’नंतर मी पाच वर्षाच्या अंतराने हा चित्रपट घेऊन येत असल्याने, मी मधल्या काळात काय बरे करत होतो, असा अनेकांना प्रश्न पडल्याचे मला लक्षात आहे. पण मी या काळात रिकामा वैगेरे नव्हतो. काही विषयांचे संशोधन व माझे लग्न या दोन महत्त्वाच्या गोष्टी मी केल्या. मग पत्नी मधुगंधा कुलकर्णी हिच्याकडून काही कल्पना ऐकल्या. प्राचीन पंढरपूरमध्ये घडणारी एक गोष्ट मला आवडली व म्हणूनच त्यावर हा चित्रपट निर्माण केला आहे. परेश मोकाशीने पुढे सांगितले की, कथा खूप प्रभावी ठरावी म्हणून प्रत्यक्ष पंढरपुरातीलच बालकांची निवड करावी, मग त्यासाठी कितीही काळ थांबावे लागले तरी चालेल, असा विचार केला. 
 
त्यानुसार श्रीरंग महाजन व सायली भंडारकवठेकर हे अनुक्रमे वय वर्षे दहा व आठ असणारे नवे चेहरे निवडले. लहानग्यांचं वेगळे भावविश्व असते, हे या चित्रपटातून मांडले आहे.

वेबदुनिया वर वाचा