लालूंना शिष्याचे आव्हान

वार्ता

सोमवार, 30 मार्च 2009 (15:58 IST)
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यंदा पाटलीपुत्र व सारण या दोन मतदारसंघातून निवडणूक लढत असून त्यांचा मुकाबला त्यांचेच एकेकाळचे शिष्य प्रा. रंजन प्रसाद यादव यांच्याशी होणार आहे.

प्रा. यादव पाटलीपुत्र मतदारसंघातून संयुक्त जनता दलातर्फे निवडणूक लढवत आहेत. सारण मतदारसंघात भाजपचे नेते व माजी मंत्री राजीव प्रसाद रूडी मैदानात उतरले आहेत. यातील प्रा. यादव हे लालूंचेच एकेकाळचे शिष्य आहेत. पंधरा दिवसांपूर्वीच ते लोकजनशक्ती पक्षात होते. तिथून त्यांनी जनता दलात उडी घेतली आणि आता ते लालूंसमोर उभे ठाकले आहेत.

त्यांच्या मते विकासाच्या मुद्यावर आता मतदान होईल. नितिश सरकारने गेल्या तीन वर्षात बराच विकास केला आहे. गुन्हेगारी कमी झाली आहे. लालू-राबडींच्या काळातील जंगलराज आता संपले आहे. त्यामुळे येथील जनतेला आता विकासाची ही संधी गमवायची नाहीये.

लोजपा आणि राजद यांची युतीही बेगडी असल्याचे सांगून लोजपाचे प्रमुख रामविलास पासवान लालुंच्या कारभाराला त्या काळात जंगलराज असे म्हणत होते, याकडेही प्रा. यादव यांनी लक्ष वेधले.

वेबदुनिया वर वाचा