पूनम यांना विधानसभेची उमेदवारी - भाजप

पूनम महाजन यांनी राज ठाकरे यांची घेतलेली भेट भलतीच पथ्यावर पडली आहे. उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातून पूनम यांना भाजपने तिकीट नाकारले असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यात येईल, अशी घोषणा भाजपला करावी लागली आहे.

पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांनी ही माहिती दिली. जम्मूहून दिल्लीला परतणार्‍या विमानात राजनाथसिंह यांनी ही माहिती दिली. उत्तर पूर्व मुंबईतून किरीट सौमय्यांना तिकीट देण्याचा निर्णय घेतल्याने पूनम नाराज झाल्या असल्या तरी विधानसभेसाठी त्यांना उमेदवारी देऊन त्यांची नाराजी दूर करण्यात येईल, असे राजनाथसिंह यांनी पूनमच्या मातोश्री रेखा महाजन यांना सांगितले आहे.

उमेदवारी नाकारल्याने पूनम व तिचे मामा गोपीनाथ मुंडे नाराज आहेत. या नाराजीतूनच काल पूनमने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीतून अनेक अटकळी लावल्या जात होत्या. पूनम मनसेमध्ये प्रवेश करत असल्याची चर्चाही रंगली होती. पूनमचे बंधू राहूल महाजन यांनीही उमेदवारी नाकारण्यावर नाराजी व्यक्त केली होती. पूनम यांनी मात्र या अटकळी फेटाळून लावत आपण भाजपमध्येच रहाणार असल्याचे म्हटले होते.

वेबदुनिया वर वाचा