पुढचा पंतप्रधान 'बायकांच्या मुठीत'

वार्ता

सोमवार, 30 मार्च 2009 (16:12 IST)
लोकसभेत महिला आरक्षण विधेयक भलेही मंजूर झाले नसेल पण आगामी सत्ता कोणाची हे यावेळी महिलाच ठरवतील असे दिसतेय. ममता, जयललिता व मायावती या तीन महिलांच्या हाती सत्तेची चावी असेल असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.

युपीए व एनडीए या दोन्ही आघाड्या फुटल्याने यांना सत्तेपर्यंत जाण्यासाठी कुणाच्या ना कुणाचा तरी आधार घ्यावाच लागेल. हा आधार या तिघींपैकी कुणाचाही वा तिघींचाही असू शकतो. उत्तर प्रदेशात कॉंग्रेस व समाजवादी पक्षातील मतभेद मायावतींच्या पथ्यावर पडणार असल्याची चिन्हे आहेत. पश्चिम बंगालमध्ये कॉंग्रेस व डावे वेगळे झाल्याचा फायदा ममतांना मिळण्याची शक्यता आहे. तमिळनाडूत पट्टाली मक्कल काची युपीएपासून वेगळा झाल्याने जयललितांच्या अण्णा द्रमुकच्या जागा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या तीन राज्यात पुढचा पंतप्रधान ठरविण्याची ताकद आहे. उत्तर प्रदेशातील ८०, बंगालमधील ४२ व तमिळनाडूतील ३९ जागा फार महत्त्वाच्या आहेत. या १६० जागा महिला नेत्यांच्या हातात आहे. या अर्थानेच पुढचा पंतप्रधान कोणतीही वा यापैकी कोणीही महिला ठरवणार हे निश्चित.

उत्तर प्रदेशात मायावतींनी स्वबळावर सत्ता आणली आहे. गेल्या वेळी लोकसभेत त्यांना १६ जागा मिळाल्या होत्या. पण आता त्यांचा बेस वाढला आहे. शिवाय सपा व कॉंग्रेस यांच्यातील मतविभागणीचा फायदा त्यांना मिळू शकतो. तमिळनाडूत सरकारविरोधी लाटेचा फायदा मिळून जयललितांना चांगल्या जागा मिळू शकतात. गेल्या वेळी त्यांना एकही जागा मिळू शकली नव्हती. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना कॉंग्रेसशी केलेल्या युतीचा फायदा होऊ शकतो. डाव्यांविरोधातील नाराजी ममतांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.

वेबदुनिया वर वाचा