शिवसेनेच्या ढाण्या वाघाची डरकाळी आता निवडणुकीच्या प्रचारातून जवळपास हद्दपार झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सामान्यजनांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे त्यांच्या खास ठाकरी शैलीतील भाषण ऐकायला मिळणार नाही. प्रकृती अस्वास्थ्यामुळे बाळासाहेबांना यावेळच्या निवडणुकीत प्रचारात न उतरविण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. बाळासाहेबांचे एकही भाषण होत नसलेली ही पहिलीच निवडणूक ठरेल.
दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी आतापर्यंतचे शेवटचे जाहीर भाषण केले होते. त्यावेळीच त्यांची प्रकृती खूपच खराब झाल्याचे दिसत होते. त्यावेळीही त्यांना भाषणादरम्यान औषधे घ्यावी लागत होती. मुद्दे आठवत नव्हते. काही दिवसांपूर्वीही त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती पाहता त्यांना प्रचारात न उतरविण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. प्रचाराच्या वक्त्याच्या यादीत त्यांचे नाव नाही.
बाळासाहेब प्रचारात नाही हे पचवून घेणे सामान्य शिवसैनिकाला खूप कठीण जाणार आहे. कारण निवडणूक आणि बाळासाहेब हे समीकरण होते. त्यांचे भाषण ऐकायला लाखो लोक जमत. त्यांच्या भाषणाची जादू उद्धव यांच्यात नाही, अशी तुलना खुद्द लोकच करतात.