टायटलर, सज्जनकुमारचे तिकीट कापले

वेबदुनिया

गुरूवार, 9 एप्रिल 2009 (19:59 IST)
शिख विरोधी दंगातून क्लिन चीट मिळालेल्या जगदीश टायटलर आणि सज्जनकुमार यांचे ति‍कीट अखेरी कापण्यात आले. पत्रकार जरनैलसिंग याने गृहमंत्री पी.चिंदबरम यांच्यावर बूट फेकल्याच्या प्रकरणानंतर शिख बांधवांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. याप्रकरणी पंजाबमध्ये आंदोलन झाले. यामुळे या दोन्ही नेत्यांना माघार घेण्यास लावण्याचा निर्णय कॉंग्रेसला घ्यावा लागला.

दिल्ली उत्तर पूर्वमधून कॉंग्रेसच्या तिकीटावर टायटलर निवडणूक लढणार होते. परंतु 1984 सालच्या दिल्लीतील शीख दंगल प्रकरणातील आरोपी काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांना सीबीआयने क्लिन चिट दिल्याचा निषेध करत एका शीख पत्रकार जरनैलसिंग याने केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या दिशेने जोडा भिरकावला होता. तसेच पंजाबमध्ये आंदोलन सुरु झाले होते. यामुळे कॉंग्रेसने टायटलर यांच्या उमेदवारीचा फेरविचार करण्याचे संकेत यापूर्वीच दिले होते.

कॉंग्रेस प्रवक्ता जर्नादन द्विवेदी यांनी जगदीश टायटलर आणि सज्जनकुमार निवडणूक लढविणार नसल्याचे आज जाहीर केले. कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी हा निर्णय घेतलआहे. या दोन्ही मतदार संघातील नवीन नावाबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टायटलरचा चेंडु सोनियांच्या कोर्टात

वेबदुनिया वर वाचा