टायटलर यांचा चेंडू सोनियांच्या कोर्टात

वेबदुनिया

गुरूवार, 9 एप्रिल 2009 (18:51 IST)
कॉंग्रेसचे नवी दिल्लीतील उमेदवार जगदिश टायटलर यांनी आपल्या उमेदवारीचा निर्णय पक्षाध्यक्षा सोनिया गांधीच घेतील, असे सांगून चेंडू त्यांच्या कोर्टात ढकलला आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या शीख विरोधी दंगलीप्रकरणी टायटलर यांना क्लीन चीट मिळाल्यानंतर संतप्त भावना उमटल्या होत्या. त्यातच याप्रकरणी एका पत्रकाराने गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्य दिशेने बूट फेकल्यानंतर तर या प्रकरणाचे गांभीर्य वाढून टायटलर यांच्या उमेदवारीवर संक्रात आली होती.

दिल्ली उत्तर पूर्वमधून कॉंग्रेसच्या तिकीटावर टायटलर निवडणूक लढणार होते. परंतु 1984 सालच्या दिल्लीतील शीखविरोधी दंगलीत ते आरोपीही होते. पण नुकतेच सीबीआयने त्यांना क्लीन चिट दिल्याचा निषेध करत जरनैलसिंग या शीख पत्रकाराने केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या दिशेने जोडा भिरकावला होता. त्यानंतर पंजाबमध्येही आंदोलन सुरु झाले होते. यामुळे कॉंग्रेसने टायटलर यांच्या उमेदवारीचा फेरविचार करण्याचे संकेत यापूर्वीच दिले होते.

पत्रकार परिषदेत बोलतांना टायटलर यांनी सांगितले की, 1984 च्या दंगल प्रकरणी माझ्या विरोधात गुन्हा दाखल झाला नाही. तसेच 1999 या प्रकरणातून मला क्लिन चीट मिळाली होती. माध्यमांना हे प्रकरण समजले नाही. मला पक्षाने उमेदवारी दिली आहे. आता त्याबाबतचा निर्णय कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर सोडला आहे. त्यांनी घेतलेला निर्णय मला मान्य असेल, असे ते म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा