अखेरच्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, 57 जागांवरील उमेदवारांचे भवितव्य ठरणार

शनिवार, 1 जून 2024 (09:44 IST)
लोकसभेच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. सकाळीच मतदानाला सुरुवात झाली आहे.सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात 57 जागांवर मतदान होत आहेत. त्यानंतर मंगळवारी 4 जून रोजी निकाल लागणार आहेत.
 
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये मतदान केले. गोरखपूरचे भाजप उमेदवार रवी किशनही यावेळी मतदान केंद्रावर रांगेत उभे असल्याचं पाहायला मिळालं.
 
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी हिमाचल प्रदेशात मतदानाचा हक्क बजावला. बूथवर पहिलं मतदान करण्याचा मान मिळाला, असं नड्डा मतदानानंतर म्हणाले.
 
तर योगी आदित्यनाथ यांनी,“आज मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडत आहे. हवामानाचा विचार करता प्रतिकूल परिस्थिती असतानाही मतदारांनी उत्साह दाखवला,” असं म्हटलं.
 
योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कन्याकुमारीतील ध्यानाबाबतही वक्तव्य केलं.
 
“मोदीजींची ही आराधना राष्ट्र आराधना आहे. 140 कोटी लोकांच्या सेवेसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी समर्पित भारत मातेच्या चरणी केलेली ही आराधना आहे. भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारात गुंतलेल्यांना आध्यात्मिक आराधना समजू शकत नाही. ते समजून घेण्यासाठी भारताच्या सनातन मूल्यांप्रती निष्ठा गरजेची आहे," असं योगी म्हणाले.
 
गाझीपूरमधील इंडिया अलायन्सचे उमेदवार अफजल अन्सारी यांनी4 जूनची वाट पाहा, इंडिया आघाडी सरकार सत्तेत येणार आहे, असं म्हटलं.
 
दुसरीकडं कन्याकुमारीमध्ये ध्यान करत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक्सवर पोस्ट केली. “लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आज मतदान होत आहे. या टप्प्यातील सर्व मतदारांना लोकशाहीच्या या महान उत्सवात उत्साहानं सहभागी होण्याची विनंती करतो. तरुण आणि महिला मतदार विक्रमी संख्येने पुढे येऊन मतदान करतील, अशी आशा आहे,” असं मोदींनी म्हटलं.

राहुल गांधींनी ट्विटरवर याबाबत पोस्ट केली. “आज मतदानाचा सातवा आणि अखेरचा टप्पा आहे. आतापर्यंतचा मतदानातील ट्रेंड पाहता, देशात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. कडक उन्हातही तुम्ही सर्वजण लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी मतदानासाठी बाहेर पडला, याचा मला अभिमान आहे"असंही राहुल गांधी म्हणाले.
 
“आजही मोठ्या संख्येने बाहेर पडा आणि अहंकार आणि अत्याचाराचं प्रतिक बनलेल्या या सरकारवर तुमच्या मताने 'अंतिम प्रहार' करा. 4 जूनचा सूर्य देशात नवी पहाट घेऊन येणार आहे," असंही राहुल गांधी म्हणाले.
 
Published By- Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती