शिवसेनेनी ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवसेनेनी 17 जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे.
पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे.
16 जणांची नावे असलेली यादी आणि मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातील उमेदवाराची वेगळी घोषणा यावेळी करण्यात आली.
कांग्रेसकडून सांगलीसाठी उमेदवार जाहीर केला जाईल, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी याआधी म्हटलं होतं. पण तिथून ठाकरे गटाने महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
ठाण्यातून राजन विचारे, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, परभणीतून संजय जाधव, उस्मानाबाद (धाराशिव)मधून ओमराजे निंबाळकर, सिंधुदुर्ग मधून विनायक राऊत या खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
मुंबईतील दोन जागांवरही काँग्रेसने दावा केला होता. पण तिथेही ठाकरे गटाने अमोल किर्तीकर आणि अनिल देसाई यांची उमेदवारी जाहीर केली आहे.