पालघर लोकसभा मतदारसंघ: तिकिटासाठी महायुतीतच ओढाताण, हितेंद्र ठाकूरांची भूमिका काय?

शुक्रवार, 8 मार्च 2024 (11:12 IST)
2008 सालच्या मतदारसंघ पुनर्रचनेत पालघर लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. यापूर्वी हा मतदारसंघ अस्तित्वात नव्हता. त्यामुळे इतिहास तसा दशकभराचा असला, तरी राजकीय समीकरणं रंगत आणणारीच आहेत.
 
शिवसेना, भाजप आणि काँग्रेस अशा तिन्ही प्रमुख पक्षांचे अस्तित्व असलेल्या या मतदारसंघात यंदाची लढत चुरशीची होईल, यात शंका नाही. त्यात शिवसेनेत दोन गट पडल्यानं महायुतीत कुणाच्या वाट्याला मतदारसंघ येतो आणि त्याविरोधात महाविकास आघाडीतून कोण उमेदवार दिला जातो, हे पाहावं लागेल.
 
त्याचसोबत, आणखी एक महत्त्वाचा पक्ष इथे ताकदवान आहे, तो म्हणजे बहुजन विकास आघाडी. हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षातर्फे या मतदारसंघात उमेदवार उतरवला गेल्यास इथली लढत तिरंगी होईल. त्यामुळे या लढतीची चुरस आणखीच वाढेल.
 
पालघर लोकसभा मतदारसंघाचा थोडक्यात इतिहास, आताची राजकीय समीकरणं आणि राजकीय प्रचारातले मुद्दे, तसंच मतदारसंघातल्या समस्या आपण या बातमीतून जाणून घेऊया.
 
पालघर लोकसभा मतदारसंघाचा असा आहे इतिहास
उत्तर मुंबई आणि डहाणू या दोन लोकसभा मतदारसंघांमधून 2008 च्या मतदारसंघ पुनर्रचनेत पालघर लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. डहाणू मतदारसंघातीलच बराचसा भाग आताच्या पालघर लोकसभा मतदारसंघात येतो.
 
डहाणू मतदारसंघात भाजप आणि कम्युनिस्टांची ताकद आहे. भाजपच्या चिंतामण वनगा यांनी अनेक वर्षे डहाणू मतदारसंघाचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलं आहे. तसंच, त्यापूर्वी काँग्रेसच्या दामोदर शिंगडा यांनीही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
 
मात्र, 2008 साली लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर इथे तीन पूर्ण आणि एक पोटनिवडणूक झाली.
पालघर लोकसभा मतदारसंघाच्या निर्मितीनंतर झालेल्या पहिल्या म्हणजे 2009 च्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव खासदार बनले. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत भाजपचे चिंतामण वनगा खासदार बनले.
 
चिंतामण वनगा यांचं 2018 मध्ये निधन झालं आणि त्यानंतर पोटनिवडणूक लागली. त्यात भाजपचे राजेंद्र गावित विजयी झाले. या पोटनिवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढले होते. त्यामुळे या निवडणुकीत रंगत आली होती.
 
भाजपनं राजेंद्र गावित यांना, तर शिवसेनेनं चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना मैदानात उतरवलं होतं. यात राजेंद्र गावितांनी बाजी मारली.
 
त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपात शिवसेनेच्या वाट्याला ही जागा आली. त्यावेळी शिवसेनेनं राजेंद्र गावितांनाच तिकीट दिलं, मात्र त्यासाठी भाजपमधून शिवसेनेत त्यांचा प्रवेश करवून घेण्यात आला. या राजकीय तडजोडीची त्यावेळी बरीच चर्चाही झाली.
 
आता शिवसेनेत दोन गट पडले आहेत आणि राजेंद्र गावित हे मूळचे भाजपचे असलेले नेते, आता शिंदे गटाकडे झुकलेले आहेत.
 
आताची राजकीय समीकरणं काय आहेत?
पालघर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात. आजच्या घडीला त्यातल्या तीन मतदारसंघांमध्ये बहुजन विकास आघाडीचं प्राबल्य आहे, तर इतर तीन मतदारसंघांमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार आहेत.
 
विधानसभा जागांच्या पातळीवर जरी भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व नसलं, तरी लोकसभा मतदारसंघ म्हणून भाजपचं वर्चस्व आहे आणि ते आधीच्या निवडणुकांमध्ये दिसून आलं आहे.
 
आता मुद्दा असा उरणार आहे की, महायुतीच्या जागावाटपात ही जागा कुणाच्या वाट्याला येणार आहे. कारण शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे विद्यमान खासदार आहेत, तर भाजपचाही या मतदारसंघावर आधीपासूनच दावा आहे.
 
भाजपकडून माजी आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांचे पुत्र डॉ. हेमंत सावरा, नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले विलास तरे अशी काही नावं चर्चेत आहेत, तर शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचंच नाव चर्चेत आहे. मात्र, महायुतीत जागा कुणाच्या वाट्याला येते, यावर हे सर्व अवलंबून आहे.
 
दुसरीकडे, बहुजन विकास आघाडीची ताकद लक्षात घेता, त्यांचा उमेदवारही महत्त्वाची भूमिका बजावेल. वरिष्ठ पत्रकार नीरज राऊत म्हणतात की, बहुजन विकास आघाडी या निवडणुकीत काय भूमिका घेईल, यावरच निकाल अवलंबून आहे. कारण या लोकसभा मतदारसंघातील सर्वाधिक मतदार असलेल्या बोईसर, नालासोपारा आणि वसाई या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये बहुजन विकास आघाडीचे आमदार आहेत आणि तिथे या पक्षाचं वर्चस्वही आहे.
 
बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर हे सत्ताधारी पक्षाच्या बाजूने राहतात, असा त्यांचा राजकीय इतिहास आहे. त्यामुळे त्यांची भूमिका आणि त्यांचा उमेदवार या मतदारसंघाचा भावी खासदार कोण हे ठरवण्यास महत्त्वाचा ठरणार आहे.
 
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असताना, काँग्रेसच्या वाट्याला ही जागा येत असे. आता समीकरणं बदलली असल्यानं शिवेसना (उद्धव ठाकरे) पक्षाला ही जागा महाविकास आघाडीकडून मिळू शकते. वरिष्ठ पत्रकार सुहास बिऱ्हाडे सांगतात त्याप्रमाणे, पालघर शहरात, तसंच वसई-विरारमधील शहरी भागात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे अस्तित्व आहे. मात्र, आव्हानात्मक परिस्थिती ते निर्माण करतील का, याबाबत राजकीय विश्लेषकांना शंका वाटते.
 
भाजपप्रमाणे महायुतीकडून उमेदवार कोण, बहुजन विकास आघाडी लढणार का आणि लढल्यास भूमिका काय, यावरच या मतदारसंघातील बरंचसं भवितव्य अवलंबून आहे.
 
पालघरमधील समस्या आणि प्रचारातले मुद्दे
पालघर लोकसभा मतदारसंघात बराचसा आदिवासी भाग येतो. त्यामुळे या भागात आदिवासी समाजाच्या समस्यांचं निराकारण गेल्या अनेक वर्षात झालेलं नाही. यात आरोग्यापासून शिक्षणापर्यंत सर्वच क्षेत्रातल्या समस्यांचा समावेश आहे.
 
वेठबिगारी हा मुद्दा सुद्धा इथे अत्यंत मोठा बनला आहे. यातून गेल्या काही काळात गंभीर प्रकारच्या घटनाही घडल्या आहेत.
 
वाढवण बंदराचा मुद्दाही या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात असेल. कारण बंदरामुळे केवळ जमीन संपादनाचा आणि पुनर्वसनाचाच प्रश्न निर्माण झाला नाहीय, तर मच्छिमारांच्या मुद्द्यांनीही डोकं वर काढलं आहे.
 
वसई, विरार आणि बोईसर हा शहरी भाग असल्यानं इथल्या नागरी सुविधांचे प्रश्न ऐरणीवर आहेत. पाणी, वीज, वैध-अवैध इमारती इत्यादी प्रश्न या शहरी भागात महत्त्वाचे ठरतील.
 
डहाणू, विक्रमगड, पालघरमधील ग्रामीण भागात मुलभूत समस्यांचीच वाणवा आहे. त्यामुळे त्याबाबत प्रचारादरम्यान काय आश्वासनं दिली जातात का, यावर लक्ष असेल. अर्थात, वर्षानुवर्षे ही दिलेली आश्वासनं पुन्हा दिली जातील, मात्र पूर्ण करण्याचं वचन कुणी देतं का आणि तशी तयारी सुरू केली जाते का, हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचं पालघर मतदारसंघाचा अभ्यास असणारे राजकीय विश्लेषक सांगतात.

Published By- Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती