गुढी पाडवा मेळाव्यानंतर राज्यातील मनसेचे कार्यकर्ते महायुतीच्या प्रचारात सामील झाले आहेत. तर दुसरीकडे मनसे नेत्यांनी महायुतीच्या उमेदवारांवरुन नाराजी व्यक्त केल्याचे दिसत आहे. मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी मुंबईतील उमेदवारांना विरोध केला आहे, याबाबत त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रचारसभा सुरू आहेत. पण, महायुतीने अजूनही मुंबईतील उमेदवार जाहीर केलेले नाहीत.
शालिनी ठाकरेंचं ट्विट काय?
"मनसेला 'धनुष्य बाण'चिन्हावर लढायला सांगणार्यावर दुसर्या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे.लक्षात ठेवा राजसाहेबांनी फक्त देशाला सक्षम नेतृत्व मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा दिला आहे, असंही आपल्या पोस्टमध्ये ठाकरे यांनी म्हटले आहे.
"इकडून तिकडून पाला पाचोळ्या सारखा उडत आलेला महाराष्ट्रद्रोही संजय निरुपम आणि भ्रष्टाचारी रविंद्र वायकर सारख्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र सैनिकांचा पाठींबा गृहीत धरू नये, असा इशाराही शालिनी ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.