अबब, मुंबईत सर्वाधिक महागडे शौचालय

मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018 (17:47 IST)
मुंबईत मरीन ड्राइव्ह येथील एअर इंडिया इमारतीच्या जवळ सुमारे एक कोटी रुपये खर्च करुन सर्वांत महागडे जागतिक दर्जाचे आरामदायी शौचालय उभारण्यात आले आहे. हे देशातील सर्वाधिक महागडे शौचालय आहे. सदरच्या ‘क्लीनटेक’स्वच्छतागृहासाठी मुंबई महापालिका, जेएसडब्ल्यू समूह, सामाटेक आणि एनपीसीसीए यांनी पुढाकार घेतला आहे. हे स्वच्छतागृह बनवताना सौंदर्यपूर्ण बांधकाम आणि इंटलिजेंट सॅनिटेशन तंत्रज्ञान यांचा संगम साधण्यात आला आहे.
 
हवामानाचा कोणताही परिणाम न होणाऱ्या जेएसडब्ल्यू टिकाऊ स्टील शीट्सपासून या शौचालयाचा मोनोलिथिक फॉर्म बनवण्यात आला आहे. वेदरिंग स्टील हे त्याचा टिकाऊपणा आणि मजबुती यामुळे जगभरातील सुप्रसिद्ध स्मारकांच्या आणि वास्तुंच्या बांधकामात वापरले जाते. हे शौचालय मरीन ड्राइव्हच्या समुद्र किनाऱ्यावर असल्यामुळे खारट हवा तसेच पावसाळ्यातील लाटांमुळे त्यांची झीज होणार नाही, अशा पद्धतीने बनवले आहे. स्वच्छतागृहातील सुविधा ही नॉर्वेतील जागतिक दर्जाच्या व्हॅक्युम तंत्रज्ञानावर आधारित असून ती सामाटेकने पुरवली आहे. या शौचालयाच्या प्रत्येक फ्लशमागे ९० टक्के पाण्याची बचत होणार आहे. एका फ्लशमागे केवळ ०.८ लीटर पाणी वापरले जाणार आहे. तर जेएसडब्ल्यू एनर्जीने पुरवलेले सौर पॅनल्स शौचालयाच्या छपरावर लावण्यात आले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती