आठ तासांची झोप ही माणसाला पुरेशी असते. मात्र, काही आळशी मंडळी दहा ते बारा तासही झोपत असतात ती गोष्ट वेगळी! काही विकारामुंळे दोन-दोन महिने झोपणारे लोकही या पृथ्वीतलावर आहेत. मात्र, अख्खे गाव दिवस-रात्र झोपलेलेच असते, हे दृश्य आपल्याला नक्कीच आश्चर्यचकित करु शकते. कझाकीस्तानात कलाची नावाचे गाव आहे. तेथील लोकांना एका विकारामुळे असे झोपेने घेरलेले आहे! या गावातील लोक एकदाझोपले की कधी उठतील, हे सांगता येत नाही. ते कधी दोन तासांतही उठू शकतात तर कधी दोन दिवसांनीही उठू शकतात. ज्यावेळी हे लोक दिवसा झोपून उठतात, त्यावेळी त्यांना झोपण्यापूर्वीच्या घडामोडी आठवत नाहीत. हा प्रकार 2012 पासून सुरु झाला असून याबाबत वेगवेगळ्या पातळीवर चौकशी सुरु आहे. या विचित्र समस्येुळे गावातील 223 कुटुंबांपैकी 68 कुटुंबांनी गाव सोडले आहे. या परिसरात किरणोत्सर्गाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसले आहे, मात्र त्याचा थेट परिणाम दिसलेला नाही. याठिकाणी पूर्वी युरेनियमच्या खाणी होत्या. तेथे कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण अधिक आहे. त्याचा हा परिणाम असावा, असेही काहींना वाटते.